

Donald Trump On Pakistan Afghanistan Conflict :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अख्ख्या जगाला टेरिफ लावून हैराण करून सोडलं आहे. त्याचबरोबर ते जगभरात आपण शांततेचे दूत असल्याचं उघड उघड आणि सातत्यानं सांगत आहेत. ते नोबेल शांतता पुरस्काराच्या रेसमध्ये देखील आहे. त्याबद्दलची इच्छा त्यांनी अनेकवेळा बोलून देखील दाखवली आहे.
ट्रम्प यांनी आपण सत्तेत आल्यापासून अनेक देशांमधील युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. नुकतेच त्यांनी आठ आंतरराष्ट्रीय संघर्ष सोडवल्याचा दावा केला आहे. तसंच त्यांनी ताज्या पाकिस्तान अफगाणिस्तान संघर्षात देखील उडी घेतली आहे. त्यांनी मी हा वाद देखील सोडवू शकतो असं सागितलं आहे. मी युद्ध सोडवण्यात चांगला असल्याचं वक्तव्य देखील केलं.
इजिप्त शांतता परिषदेला जात असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, 'मी फक्त टॅरिफच्या जोरावर काही युद्ध थांबवली आहेत. भारत पाकिस्तान युद्धाचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता. मी म्हणालो की तुमच्याकडे न्युक्लिअर वेपन आहेत. तुम्हाला (भारत - पाकिस्तान) जर लढायचं असंल तर मी तुम्हा दोघांवर देखील १००, १५०, २०० टक्के टॅरिफ लादणार.'
ट्रम्प पुढे म्हणाले, 'मी टॅरिफ लावणार म्हटल्यावर २४ तासात युद्धावर तोडगा निघाला. जर मी टॅरिफचा विषय काढला नसता तर हे युद्ध थांबलं नसतं.'
डोनाल्ड ट्रम्प जरी रोज उठून मी भारत - पाकिस्तान युद्ध टॅरिफची धमकी देऊन थांबवलं असं म्हणत असले तरी भारतानं हा दावा फेटाळला आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान अमेरिकेचा कोणताही हस्तक्षेप झाला नाही किंवा त्यामुळं पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी झालेली नाही असं स्पष्टीकरण भारतानं दिलं आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी आपला मोर्चा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात होत असलेल्या ताज्या संघर्षाकडं वळवला. तसंच त्यांनी गाझा शस्त्रसंधी ही आपण घडवून आणलेली आठवी शस्त्रसंधी आहे असा दावा देखील केला. ते म्हणाले, मी आठव्या युद्धाचा प्रश्न सोडवला आहे. मी ऐकलं आहे की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात आता युद्ध सुरू झालं आहे. मी म्हणालो मी परत येईपर्यंत थांबावं लागेल. मी अजून एक शस्त्रसंधी करणार आहे. मी युद्ध सोडवण्यात चांगला आहे.' ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया एअर फोर्स वन विमानात असताना दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, माझं युद्धाचे प्रश्न सोडवण्याचे ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगलं आहे. त्यांनी २०२५ च्या नोबेल पारितोषिकाबाबत देखील मत व्यक्त केलं ते म्हणाले की मी हे सर्व नोबेल प्राईजसाठी करत नाहीये. मी हे लोकांचे जीव वाचवण्यासाठी करत आहे.