

पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषविण्याबाबत गंभीर विचार करत आहेत. रविवारी NBC News चॅनेलला ट्रम्प यांनी त्यांचा खासगी क्लब 'मार-ए-लागो' मधून फोनवरून मुलाखत दिली.
'आय ॲम नॉट जोकिंग. यासाठी काही पद्धती आहेत. पण सध्या याबद्दल विचार करणे हे खूपच लवकर होईल,' असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या या वक्तव्याने अमेरिकेच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
"खरे तर, अनेक लोक माझ्याकडे तिसऱ्या कार्यकाळासाठी उभे राहण्याची मागणी करत आहेत. वास्तविक, तो चौथा कार्यकाळ असेल, कारण 2020 ची निवडणूक पूर्णपणे धांदात फसवणूक होती," असेही ट्रम्प नंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
ट्रम्प यांनी यापूर्वीही रिपब्लिकन कार्यक्रमांमध्ये दोनहून अधिक कार्यकाळांबद्दल विनोद केले होते. AP न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, जानेवारीत त्यांनी हाऊस रिपब्लिकन नेत्यांना "मी पुन्हा निवडणूक लढवू शकतो का?", असे विचारले होते. यावेळी मात्र ट्रम्प अधिक थेट आणि स्पष्ट बोलले आहेत. त्यामुळे खरोखरच ट्रम्प आपला कार्यकाळ वाढविण्यासाठी काही मार्ग शोधत असल्याचे दिसून येत आहे.
अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार राष्ट्राध्यक्षांना केवळ दोनच टर्म (कार्यकाळ) मिळतात. 1951 मध्ये 22 व्या घटनादुरूस्तीनंतर ही दुरूस्ती केली गेली होती. त्या आधी फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हे अमेरिकेचे चार वेळा राष्ट्राध्यक्ष बनले होते.
या दुरुस्तीत स्पष्ट नमूद केले आहे की, "कोणत्याही व्यक्तीला दोनपेक्षा जास्त वेळा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले जाणार नाही. तसेच, जर कोणाला दोन वर्षांपेक्षा अधिक काळ राष्ट्राध्यक्षपद सांभाळावे लागले असेल, तर तो फक्त एकदाच राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडून येऊ शकतो."
दरम्यान, NBC News च्या क्रिस्टन वेल्कर यांनी याबात ट्रम्प यांना थेट विचारले की, "तुमच्या मर्यादा ओलांडण्याचा एक मार्ग असा असू शकतो का की उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वान्स निवडून येतील आणि नंतर पदाचा राजीनामा देतील?"
यावर ट्रम्प म्हणाले की, "होय, तो एक मार्ग आहे. पण त्याशिवाय आणखीही काही मार्ग आहेत."
इतर पर्याय कोणते आहेत? असे विचारले असता, ट्रम्प यांनी केवळ "नाही" असे उत्तर देऊन अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.
जर राष्ट्राध्यक्षाने दोन वर्षांपेक्षा कमी काळासाठी कार्यभार सांभाळला असेल, जर उपराष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्षाच्या मृत्यू, राजीनामा किंवा पदच्युत होण्यामुळे पदावर आला आणि दोन वर्षांपेक्षा कमी काळ सत्तेत राहिला, तर त्याला दोन पूर्ण कार्यकाळांसाठी निवडून येण्याची संधी मिळते. अशा परिस्थितीत, तो एकूण 10 वर्षे (2 वर्षे + 2 पूर्ण कार्यकाळ) राष्ट्राध्यक्ष राहू शकतो.
22 वी घटनादुरुस्ती रद्द करणे: जर अमेरिकेच्या संविधानातील 22 वी घटनादुरुस्ती रद्द केली गेली, तर राष्ट्राध्यक्षांना दोनपेक्षा अधिक कार्यकाळ मिळू शकतो. यासाठी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोन-तृतीयांश मतांनी मंजुरी आणि 75 टक्के राज्यांच्या विधानसभांची मान्यता आवश्यक असेल.
तिसऱ्या कार्यकाळासाठी संविधानात बदल करण्यासाठी राजकीय पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न ट्रम्प करू शकतात. तथापि, यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर काँग्रेस आणि राज्य सरकारांचे सहकार्य आवश्यक असेल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारीत अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. यापूर्वी, 2017 ते 2021 दरम्यान, ते 45 वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या नंतर डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडन राष्ट्राध्यक्ष झाले होते.