भारताची माफी मागा; जालियनवाला बाग हत्याकांडप्रकरणी ब्रिटिश संसदेत खासदार आक्रमक

UK Parliament on Jallianwala Bagh massacre : हत्याकांडानांतर 106 वर्षांनी खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी केली मागणी
UK Parliament on Jallianwala Bagh massacre
UK Parliament on Jallianwala Bagh massacre Pudhari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्वाची घटना असलेले जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरण आता पुन्हा चर्चेत आले आहे. या हत्याकांडाला 106 वर्षे पूर्ण झाली आहेत.

त्यानंतर आता ब्रिटनच्या संसदेत तेथीलच एका खासदाराने या हत्याकांडासाठी ब्रिटनने भारताची औपचारिक माफी मागावी, अशी मागणी केली आहे. या मागणीवरून ब्रिटनच्या संसदेत गदारोळ झाला.

ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी ही मागणी केली. सन 1919 मध्ये पंजाबमधील जालियनावाला बाग येथे हे हत्याकांड (Jallianwala Bagh massacre) घडले होते. ब्लॅकमॅन यांनी या घटनेचा उल्लेख ब्रिटिशांच्या वसाहत काळाच्या इतिहासातील 'लाजिरवाणा काळा डाग' असे संबोधित केले आहे.

दरम्यान, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या 106 व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर, ब्रिटिश सरकारने या घटनेसाठी माफी मागावी का? यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच, ब्रिटिश कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे (हुजुर पक्ष) खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी सरकारला या अमानवीय कृत्याची जबाबदारी स्वीकारून औपचारिक माफी मागण्याचे आवाहन केले.

काय म्हणाले खासदार बॉब ब्लॅकमॅन?

  • ब्रिटन सरकारने औपचारिक जाहीर माफी मागावी

  • हत्याकांडातील अन्याय मान्य करून अधिकृत विधान करावे

  • ही घटना म्हणजे ब्रिटिशांच्या वसाहतकालीन इतिहासावरील "लाजिरवाणा काळा डाग" म्हटले आहे

13 एप्रिलपुर्वी माफी मागा - ब्लॅकमॅन

संसदेत बोलताना, ब्लॅकमॅन यांनी 13 एप्रिल 1919 च्या त्या भयानक घटनेची आठवण करून दिली. यात जालियनवाला बाग येथे ब्रिटिशांच्या निषेधासाठी जमलेल्या भारतीयांवर जनरल डायरच्या आदेशाने ब्रिटिश सैन्याने बेछूट गोळीबार केला होता.

ते म्हणाले की, "त्या दिवशी अनेक कुटुंबे जालियनवाला बागेत शांतता निषेधासाठी जमली होती. मात्र, ब्रिटिश सैन्याच्या नेतृत्वाखालील जनरल डायरने आपल्या सैनिकांना नागरीकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला आणि पूर्ण दारुगोळा संपेपर्यंत हा नरसंहार सुरूच राहिला.

या घटनेत 1500 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले तर 1200 हून अधिक लोक जखमी झाले, असे ब्लॅकमॅन म्हणाले.

"यंदा 13 एप्रिल रोजी या घटनेचा स्मृतिदिन येत आहे, मात्र त्यावेळी ब्रिटिश संसदेची सुट्टी असेल. त्यामुळे, त्या अगोदर सरकारने अधिकृत विधान जारी करून काय चूक झाली हे मान्य करावे आणि भारतातील जनतेची माफी मागावी," असे आवाहन त्यांनी केले.

माजी पंतप्रधान थेरेसा मे यांनीही माफी मागितली नव्हती

ब्लॅकमॅन यांनी याकडेही लक्ष वेधले की, 2019 मध्ये तत्कालीन पंतप्रधान थेरेसा मे यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाला ब्रिटिश राजवटीच्या काळातील काळा डाग म्हटले होते, मात्र त्यांनी याबाबत औपचारिक माफी मागितली नव्हती.

"जनरल डायरला त्याच्या कृत्यासाठी अपमानास्पदरीत्या पदच्युत करण्यात आले होते. परंतु हा ब्रिटिश वसाहती काळातील लाजिरवाणा इतिहास आहे, असे 2019 मध्ये थेरेसा मे यांनी म्हटले होते.

ब्रिटिश संसदेतील प्रतिसाद

दरम्यान, संसदीय नेते लुसी पॉवेल यांनीही खासदार ब्लॅकमॅन यांचे आभार मानले आणि जालियनवाला बाग हत्याकांडाला "ब्रिटिश वसाहत काळातील सर्वात लाजिरवाण्या आणि कुप्रसिद्ध घटनांपैकी एक" असे संबोधले.

जालियनवालामध्ये नेमके काय घडले होते?

13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर (पंजाब) येथील जालियनवाला बाग येथे जमलेल्या भारतीयांच्या जमावावर ब्रिटिश सैन्याने जनरल रेजिनाल्ड डायरच्या आदेशाने अंदाधुंद गोळीबार केला. हा जमाव ब्रिटश सरकारच्या दडपशाही करणाऱ्या रौलेट कायद्याच्या विरोधात शांततामय निदर्शने करत होता.

ब्रिटिश सैन्याने बागेचा एकमेव बाहेर पडण्याचा मार्ग रोखून धरला आणि दारूगोळा संपेपर्यंत गोळीबार सुरू ठेवला. या घटनेत 1500 हून अधिक लोक ठार झाले. त्यामध्ये स्त्रिया आणि लहान मुलांचाही समावेश होता तर हजारो लोक गंभीर जखमी झाले.

ही घटना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरली. बिटिशांच्या या क्रौर्यामुळे भारतभर संतापाची लाट उसळली आणि स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र झाला.

UK Parliament on Jallianwala Bagh massacre
झक्कास! बंगळुरूमध्ये सुरू झाली ड्रोन डिलिव्हरी; केवळ 7 मिनिटांत पार्सल घरपोच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news