

दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतावर सातत्याने टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी भारत-अमेरिका व्यापार करारावर सकारात्मक संकेत देणाऱ्या ट्रम्प यांनी अचानक भारतावर २५ टक्के टॅरिफ लादून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. इतकेच नाही, तर रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्रांची खरेदी सुरू ठेवल्यास अतिरिक्त दंड आकारण्याची धमकीही त्यांनी दिली आहे. भारताने रशियन तेल आयातीवर घेतलेल्या भूमिकेनंतर अमेरिकेकडून धमक्यांचे सत्र वाढले असून, त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला 'मृत अर्थव्यवस्था' असेही संबोधले आहे. मात्र, ट्रम्प यांच्या या नाराजीमागे केवळ रशियन तेलाची खरेदी हे एकमेव कारण नसून, इतरही अनेक महत्त्वाची कारणे आहेत.
ट्रम्प यांना भारताकडून नेमकी अडचण काय?
भारताविषयी डोनाल्ड ट्रम्प यांचा पवित्रा अचानक बदललेला दिसत आहे. आधी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादला आणि आता रशियासोबत व्यापार सुरू ठेवल्यास दंडात्मक कारवाईची धमकी दिली जात आहे. विशेष म्हणजे, अमेरिका पूर्वी भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी विनवण्या करत होता, तोच आता हा व्यापार बंद करण्यासाठी दबाव का आणत आहे? डोनाल्ड ट्रम्प यांना भारताकडून नेमकी काय आणि का अडचण निर्माण झाली आहे? यामागील तीन प्रमुख कारणे आहेत.
युक्रेनसोबत सुरू असलेले रशियाचे युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व प्रयत्न केले आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना जबर शुल्काच्या धमक्या देऊनही काही परिणाम न झाल्याने, ट्रम्प यांनी आता रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यात भारताचाही समावेश आहे. गेल्या महिन्यात नाटोचे महासचिव आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या बैठकीनंतरच याचे संकेत मिळाले होते, जेव्हा ट्रम्प यांनी रशियाला युक्रेनमधून सैन्य मागे घेण्यासाठी ५० दिवसांची मुदत दिली होती. यानंतर महासचिव मार्क रूट यांनी भारत, चीन आणि ब्राझीलला रशियासोबत व्यापार केल्यास जबर शुल्क आकारण्याचा स्पष्ट इशारा दिला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी २५% शुल्क लादले आहे.
भारत रशियन तेलासोबतच मोठ्या प्रमाणात रशियन शस्त्रास्त्रेही खरेदी करतो. देशात रशियन आयातीत मोठी वाढ झाली आहे. हीच गोष्ट ट्रम्प यांना खटकत आहे. अमेरिकेचे असे मत आहे की, भारत मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी करून युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू ठेवण्यासाठी रशियाला आर्थिक मदत करत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनीही म्हटले होते की, भारताची रशियन तेल खरेदी ही युक्रेनमधील युद्ध सुरू ठेवण्यास मदत करत आहे आणि हे भारत-अमेरिका संबंधांमधील तणावाचे प्रमुख कारण आहे.
दुसरं कारण म्हणजे BRICS देशांचा वाढता प्रभाव. भारत हा BRICSचा संस्थापक सदस्य आहे. या संघटनेत सामील देशांवर १० टक्के अतिरिक्त शुल्क लावण्यात येईल, असे म्हटले होते. 'ब्रिक्स' हा जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा एक गट आहे, ज्यात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे संस्थापक सदस्य आहेत. १ जानेवारी २०२४ रोजी इराण, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचाही यात समावेश झाला.
'ब्रिक्स'मधील आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेले रशिया आणि चीन एकमेकांसोबत त्यांच्या स्वतःच्या चलनामध्ये व्यापार करतात. इतकेच नाही, तर २०२२ मध्ये रशियाने 'ब्रिक्स' देशांसाठी एका आंतरराष्ट्रीय चलनाची (International Currency) संकल्पनाही मांडली होती. डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचे हे प्रयत्न अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाला मोठे आव्हान देऊ शकतात आणि हीच ट्रम्प यांच्या चिंतेची मुख्य बाब आहे. त्यामुळेच ते भारतासह इतर 'ब्रिक्स' सदस्यांवर नाराज आहेत.
अमेरिकेच्या नाराजीचे तिसरे कारण म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक प्रयत्नांनंतरही भारत आपल्या भूमिकेवर ठाम आहे. भारत-अमेरिका व्यापार करार (India-US Trade Deal) अनेक चर्चांनंतरही पूर्णत्वास जाऊ शकलेला नाही. कारण, ट्रम्प अमेरिकन कृषी आणि डेअरी उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ खुली करण्याची आणि आयात शुल्क कमी करण्याची मागणी करत आहेत. मात्र, भारत सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करून करार केला जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. या ठाम भूमिकेनंतरच ट्रम्प यांचा भारताविषयीचा दृष्टिकोन अधिक कठोर झाला आहे.