Donald Trump : सौदापूर्तीचा आठवडा... लहरी ट्रम्पचे वादळ धडकणार

गुंतवणूकीच्या विश्वात ! युक्रेन-रशिया युद्धात एकापाठोपाठ एक वेगवान घडामोडी; युद्ध आणखी भडकणार
Trump
लहरी ट्रम्पPudhari File Photo
Published on
Updated on

नाशिक : मागील सप्ताहात दिवाळीपूर्वी शेअरबाजाराने तब्बल चार टक्क्यांनी शानदार उसळी घेत २६,५०० अंशांकडे वेगवान आगेकूच सुरू केली होती. सारेकाही आलेबल असल्याचे वाटत असतानाच २३ ऑक्टोबरला युक्रेन-रशिया युद्धात एकापाठोपाठ एक वेगवान घडामोडी घडल्या आणि हे युद्ध आणखी भडकणार, हे एव्हाना स्पष्ट झाले.

परिणामी शुक्रवारी (दि.24) हेविवेट शेअर तसेच एफएमसीजी, फार्मा, बँकिंग शेअरमध्ये जोरदार नफारूपी विक्री झाली आणि निफ्टी पुन्हा २५,८०० अंशांवर गडगडला. युक्रेन आणि रशियाने आता एकमेकांवर थेट लांब पल्ल्यांचे क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले. युक्रेनच्या हल्ल्यात रशियाच्या तेलशुद्धीकरण केंद्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रशियाचा तेलपुरवठा तब्बल २० टक्के घटला. या वृत्ताने खनिज तेलाच्या दराने उसळीला सुरुवात केली आहे. हीच बाब वित्तीय तुटीबाबत भारताला अडचणीची ठरली आहे. खनिज तेलाचे दर ७५ डॉलरपर्यंत उसळल्यास भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम होणार आहे.

अमेरिकेबरोबरील व्यापार कराराच्या पातळीवरही भारताची स्थिती अक्षरश: इकडे आड तिकडे विहीर, अशी झालेली आहे. वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी व्यापार कराराच्या वाटाघाटी योग्य दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट केले असताना अमेरिकेने जाचक अटी घातल्याचे वृत्त शनिवारी धडकल्याने करार सहजासहजी होणार नसल्याचे स्पष्ट झाले, असे वृत्त बाजार नेमके उच्च पातळीवर असताना येते. परिणामी बाजार २६,३०० अंशांच्या पातळीवरून वारंवार माघारी फिरत आहे. जूनपासून किमान चारवेळा अशी स्थिती शेअरबाजाराने अनुभवली आहे.

Trump
वेध शेअर बाजाराचा : मोठी झेप घेण्याच्या पवित्र्यात भारतीय बाजार ?

पुढील आठवड्यात जागतिक पातळीवर अनेक बैठका होत आहेत. आसियान बैठकीदरम्यान अमेरिका-चीन व्यापार करारासाठी ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष यांच्यात वाटाघाटी होणार आहेत. कराराबाबत समाधानकारक टिप्पणी दोन्ही नेत्यांकडून आल्यास जगभरातील बाजार उसळतील, अशी परिस्थिती आहे. परंतु जर तिढा कायम राहिला, तर आशियाई शेअरबाजारांची वाटचाल अडखळणार आहे. लहरी ट्रम्प काय बोलतात आणि कोणत्या देशावर धमक्यांचे वादळ धडकणार याकडे बाजाराचे लक्ष आहे.

व्याजदर कपातीचा अपेक्षा

पुढील आठवड्यात २९ ऑक्टोबरला अमेरिकी फेडरल बँक आपले पतपुरवठा धोरण जाहीर करणार आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या सीपीआय दरात किंचित घसरण दिसून आल्याने फेडरल बँकेने सुटकेचा नि:श्वास सोडलेला आहे. फेडरल बँक किमान ०.२५ टक्क्यांनी व्याजदर कपात जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यांनी दरकपात केल्यास जगभरातील जागतिक रोखतेचा प्रवाह आणखी वेगवान होईल. त्यामुळे अन्य बँकाही व्याजदर कपातीचे अनुकरण करतील. ही बाब भारतीय बाजारासाठी सकारात्मक आहे. परिणामी निफ्टी २६ हजार अंशांच्या पातळीवर स्थिर राहील. परंतु अमेरिकेची व्याजदर कपात म्हणजे ते भारत आणि चीनबरोबर सहजासहजी व्यापार करणार नाहीत आणि रशिया-युक्रेन युद्धही खेळवत राहतील, ही चाल होय.

सौदापूर्तीमुळे अनिश्चिततेत भर

ऑक्टोबर सिरीजची पूर्तता येत्या ३० ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी बाजारात कमालीची अनिश्चितता राहणार आहे. शुक्रवारच्या घसरणीमुळे निफ्टीला आणखी खाली खेचत ती २५,५०० च्या अंशांवर आणण्याचे प्रयत्न होतील आणि बुधवारी रात्री ट्रम्प आश्चर्यकारक घोषणा करत निफ्टीचा झोका पुन्हा उंच नेऊ शकतील. या आश्चर्यासाठी गुंतवणूकदारांनी तयार राहिले पाहिजे.

आयटीसी, डाबरचे निकाल

शनिवारी कोटक बँकेने शानदार निकाल जाहीर करत बँकिंग क्षेत्रासाठी आशेची पालवी कायम ठेवली. या आठवड्यात आयओसी, टीव्हीएस, लार्सन ॲण्ड टुब्रो, हिंदुस्तान पेट्रोलियम, आयटीसी, सिप्ला, डाबर इंडिया, मारुती सुझुकी इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि एसीसी आपले निकाल जाहीर करणार आहेत. या कंपन्यांचे निकाल जोरदार आले, तर निफ्टीला २५ हजार अंशांची पातळी टिकवून ठेवता येईल.

२६ हजारांची पातळी महत्त्वाची

निफ्टी २६,१०० अंशांवरून २५,८०० अंशांवर आलेली आहे. ऑक्टोबरची सिरीज ३० ऑक्टोबरला वायदापूर्ती आहे. त्यामुळे २७ आणि २८ ऑक्टोबरला प्रचंड अस्थैर्य राहणार आहे. निफ्टीसाठी ५० आणि २०० दिवसांची सरासरी पातळी २५,५०० वर असल्याने निफ्टीला तेथे आणत तेथून पुन्हा २६ हजार अंशांवर नेण्याचे डावपेच विदेशी वित्तसंस्था आखताना दिसतील.

आयसीआयसीआय लोम्बार्ड पुन्हा प्रकाशझोतात

जनरल इन्शुरन्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्डने चमकदार कामगिरी बजावली आहे. वित्तीय वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा करोत्तर नफा १८.१ टक्क्यांनी वाढून, ८२० कोटी रुपयांवर पोहचला आहे. २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने ६९४ कोटी रुपयांचा करोत्तर नफा कमविला होता. त्या तुलनेत समाधानकारक वाढ झालेली आहे. वित्तीय वर्ष 2026 च्या पहिल्या सहामाहीत कंपनीचे ढोबळ थेट प्रीमियम उत्पन्न (जीडीपीआय) १४३.३१ अब्ज रुपये नोंदविले गेले आहे. संचालक मंडळाने यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीसाठी प्रतिसमभाग ६.५० रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. या समाधानकारक कामगिरीमुळे सध्या हा शेअर प्रकाशझोतात आला असून, तो पुन्हा आपल्या २२०० रुपयांच्या उच्चांकी पातळीसाठी सज्ज झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news