

'Do not work more than 40 hours' – Indian woman shares New Zealand office rule
पुढारी ऑनलाईन : न्यूझीलंडमध्ये नोकरी करणाऱ्या भारतीय महिलेने तिच्या व्हायरल व्हिडिओमध्ये तेथील ऑफिस संस्कृतीचे कौतुक केले आहे. तिच्या मते, तिथे कर्मचाऱ्यांना केवळ कर्मचारी म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून सन्मान दिला जातो.
भारतात कामाचे तास (वर्किंग अवर्स), ओव्हरटाइम आणि वर्क-लाईफ बॅलन्स यावर अनेकदा चर्चा होत असते. चांगली नोकरी, अधिक पगार आणि उत्तम जीवनशैलीच्या शोधात अनेक भारतीय परदेशात जातात. त्यामुळे जेव्हा एखादा भारतीय परदेशातील कामाच्या संस्कृतीचा अनुभव सांगतो, तेव्हा तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो. सध्या न्यूझीलंडमध्ये काम करणाऱ्या भारतीय महिला यामिका गांधी यांचा असाच एक व्हिडिओ चर्चेत आहे.
यामिका यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत सांगितले की, न्यूझीलंडमध्ये कर्मचाऱ्यांकडे केवळ काम करणारी व्यक्ती म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून पाहिले जाते. त्यांच्या वेळेचा, मेहनतीचा आणि वैयक्तिक आयुष्याचा आदर केला जातो.
शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ऑफिस जवळपास रिकामे
यामिका यांनी व्हिडिओमध्ये त्यांचे ऑफिस दाखवले असून, शुक्रवारी संध्याकाळी सुमारे 4 वाजता ते जवळपास रिकामे दिसत होते. त्यांनी सांगितले की, शुक्रवारी त्यांचे बहुतांश सहकारी घरून काम (वर्क फ्रॉम होम) करतात. तसेच, ठरलेल्या वेळेनंतर उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबणे तिथे सामान्य मानले जात नाही.
छोट्या-छोट्या कामासाठीही मिळते 'थँक यू'
यामिका यांनी सांगितले की, अलीकडेच त्यांनी एक महत्त्वाचे काम पूर्ण केले. त्यानंतर त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांना संदेश पाठवला – "Thank you Yamika, really appreciate the work that you do."
त्यांच्या मते, सुरुवातीला हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटत असे, कारण ते काम त्यांनी आपली नियमित जबाबदारी समजून केले होते. मात्र, न्यूझीलंडमध्ये अगदी छोट्या कामासाठीही सहकारी एकमेकांचे कौतुक करतात आणि आभार मानतात.
'जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबू नका'
यामिका यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे सहकारी अनेकदा त्यांना सांगतात, "जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबू नका, घरी जा." नोकरीच्या सुरुवातीलाच त्यांच्या मॅनेजरने स्पष्ट सांगितले होते की, आठवड्यात 40 तासांपेक्षा जास्त काम करू नये. एखाद्या डेडलाइनमुळे अतिरिक्त वेळ काम करावे लागल्यास, त्याची भरपाई दुसऱ्या दिवशी सुटी किंवा कमी वेळ काम करून केली जाते.
'इथे कर्मचाऱ्याला माणूस म्हणून पाहिले जाते'
यामिका सांगतात की, न्यूझीलंडमध्ये कर्मचाऱ्यांना फक्त कर्मचारी म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून वागणूक दिली जाते. एखादा कर्मचारी अडचणीत असेल किंवा त्याची तब्येत ठीक नसेल, तर मॅनेजर आणि सहकारी त्याची विचारपूस करतात आणि आवश्यक ते सहकार्यही करतात.
भारत आणि न्यूझीलंडच्या वर्क कल्चरबाबत काय म्हणाल्या?
यामिका यांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारे सांगितले की, भारतातील अनेक कार्यस्थळांवर कर्मचाऱ्यांकडून ओव्हरटाइम आणि काही वेळा आठवड्याच्या सुटीच्या दिवशीही काम करण्याची अपेक्षा केली जाते. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे मोजमाप त्यांच्या कामाच्या गुणवत्तेपेक्षा त्यांनी ऑफिसमध्ये घालवलेल्या तासांवर केले जाते. मात्र, प्रत्येक कंपनीची कामाची पद्धत वेगळी असते आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचा अनुभवही वेगळा असू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी अशा वर्क कल्चरची इच्छा व्यक्त केली, जिथे कर्मचाऱ्यांच्या कामासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचाही आदर केला जातो.
तर काहींनी वेगळी भूमिका मांडली. त्यांच्या मते, एका व्यक्तीच्या अनुभवावरून संपूर्ण देशाच्या कामाच्या संस्कृतीबाबत निष्कर्ष काढणे योग्य नाही, कारण प्रत्येक कंपनीची कार्यसंस्कृती वेगळी असते.
सध्या यामिका गांधी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, वर्क-लाईफ बॅलन्स, ओव्हरटाइम आणि कर्मचाऱ्यांशी वागणूक या विषयांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.