

harsh goenka share video new business rs 70000 monthly by tilak
पुढारी ऑनलाईन : प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण केवळ भाविकांना टिळा लावून महिन्याला सुमारे 70 हजार रुपये कमावता येतात, असा दावा करताना दिसतो.
खरंच फक्त टिळा लावून एवढी मोठी कमाई करता येते का? या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एका तरुणाने कमाईचा वेगळाच मार्ग सांगितला आहे. तो सांगतो की, योग्य पद्धतीने काम केल्यास केवळ टिळा लावूनही महिन्याला 70 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवता येऊ शकते.
व्हिडिओमध्ये हा तरुण धार्मिक स्थळी भाविकांना टिळा लावताना दिसतो. तो सांगतो की, ऋषिकेशमध्ये भाविकांना टिळा लावून चांगली कमाई करता येते. यासाठी फक्त पारंपरिक वेशभूषा परिधान करून भाविकांमध्ये जावे लागते.
दिवसभरात किती कमाई झाली?
व्हिडिओतील तरुण सांगतो की, सुरुवातीला लोक टिळा लावून घेण्यास नकार देतात. पहिल्या एका तासात तो अवघ्या 20 जणांना टिळा लावतो आणि त्यातून त्याला फक्त 50 ते 60 रुपयांची कमाई होते.
मात्र, संध्याकाळी गंगा आरती सुरू झाल्यानंतर संपूर्ण चित्र बदलते. तो घाटावर जाऊन भाविकांना टिळा लावतो. काही जण 10 रुपये, काही 20 रुपये, तर काही जण 100 रुपयांपर्यंत दक्षिणा देतात. अवघ्या तीन तासांत तो सुमारे 400 जणांना टिळा लावतो आणि त्यातून त्याची सुमारे 2,350 रुपयांची कमाई होते.
महिन्याला सुमारे 70 हजार रुपयांची कमाई?
व्हिडिओच्या शेवटी हा तरुण दावा करतो की, दररोज काही तास हे काम केल्यास महिन्याला सुमारे 70 हजार रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. हर्ष गोयंका यांनी हा व्हिडिओ शेअर करत "पैसे कमावण्याचा नवा मार्ग सापडला," असे विनोदी कॅप्शन दिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
टीप: या व्हिडिओतील कमाईचे आकडे संबंधित तरुणाने केलेल्या दाव्यावर आधारित आहेत. या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.