

Bangladesh Hindu Protest : मुस्लिम बहुसंख्य बांगलादेशात अल्पसंख्याकांच्या हक्कांबद्दल पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. राजधानी ढाका येथे शुक्रवारी (दि. १९) हजारो हिंदूंनी प्रभू श्री रामाच्या प्रतिमेचा झालेला कथित अपमान आणि एका भव्य मूर्तीचे बांधकाम रोखल्याच्या निषेधार्थ विशाल मशाल मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांनी 'जय श्री राम'च्या घोषणाही दिल्या.
रंगपूरमध्ये कट्टरपंथियांकडून प्रभू रामाच्या सर्वात उंच मूर्तीच्या बांधकामाला विरोध करण्यात आल्यानंतर आणि त्यांच्या प्रतिमेचा कथित अपमान केल्यानतंर ढाक्यात तीव्र निदर्शने सुरू झाली आहेत. दोषींना अटक करण्याच्या मागणीसाठी हजारो हिंदूंनी ढाक्यात मशाल मोर्चा काढला. यावेळी परिसर 'जय श्री राम'च्या घोषणांन दणाणून गेला. 'हिंदू महाजोट'च्या आवाहनावरून अनेक हिंदू संघटना आणि विद्यार्थी शाहबाग चौकात एकत्र आले. यानंतर 'नॅशनल प्रेस क्लब'पर्यंत मोर्चा काढला. प्रेस क्लबसमोर मानवी साखळीही तयार करण्यात आली, एका गटाने 'ढाका रिपोर्टर्स युनिटी' (DRU) जवळ आपला निषेध नोंदवला. दुसरीकडे, रंगपूरमध्ये पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यानंतर किरकोळ चकमक झाल्याचेही वृत्त आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला गाईबांधा येथे झालेल्या आंदोलनादरम्यान कट्टरपंथी जमावाने प्रभू रामाच्या प्रतिमेचा अपमान केल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
उत्तर गाईबांधा जिल्ह्यातील पलाशबाडी येथील एका मंदिर परिसरात प्रभू रामाची ८१ फूट उंच मूर्ती उभारली जात होती. याचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. 'श्री श्री राधा गोविंद मंदिर समिती'चे अध्यक्ष हरिदास चंद्र दास यांनी सांगितले की, कट्टरपंथी गटांकडून प्रकल्पाशी संबंधित लोकांना धमक्या आल्यानंतर हे काम थांबवण्यात आले आहे. दरम्यान, सुमारे २२ कोटी बांगलादेशी टका (अंदाजे १६ कोटी रुपये) खर्च असलेल्या या प्रकल्पात ५० फुटांची प्रभू कृष्णाची आणि ३० फुटांची प्रभू शिवाची मूर्तीही प्रस्तावित आहे. मंदिर समितीचे सल्लागार श्यामलाल कुमार महंत यांच्या मते, "सामाजिक सलोखा राखण्यासाठी" सध्या हे काम थांबवण्यात आले आहे. भीतीचे सावट असलेल्या आयोजकांनी काम थांबवण्यासोबतच देशाचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बीएनपी सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करत आंदोलकांनी दोषींच्या अटकेसाठी ७२ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास पुढे आणखी मोर्चे काढले जातील, असा इशारा हिंदू समुदायाने दिला आहे. या प्रकरणी धार्मिक व्यवहार मंत्रालयाला निवेदनही सादर केले जाणार आहे. राम मूर्तीचे बांधकाम पुन्हा सुरू करू दिले नाही, तर बांगलादेशातील सर्व ६४ जिल्ह्यांमध्ये एकही राम मंदिर बांधू, असा थेट इशारा हिंदू महाजोटने दिला आहे. याशिवाय, 'राष्ट्रीय पूजा उत्सव समिती'ने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.
बांगलादेशात हिंदू हा सर्वात मोठा धार्मिक अल्पसंख्याक गट असून ते एकूण लोकसंख्येच्या सुमारे ८ टक्के आहेत. मागील मुहम्मद युनूस सरकारच्या काळातील संकटानंतर तिथे हिंदूंना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये पदभार स्वीकारलेले पंतप्रधान तारिक रहमान यांनी हा देश "सर्वांचा आहे" असा वारंवार दावा केला होता, परंतु आकडेवारीनुसार या वर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीतच जातीय हिंसेच्या १३३ घटनांची नोंद झाली आहे.