

Norway Chess 2025 | Gukesh vs Carlsen
जगप्रसिद्ध बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला सलग दुसऱ्या वर्षी नॉर्वे चेस स्पर्धेत एका भारतीय किशोराने क्लासिकल फॉरमॅटमध्ये पराभूत केले आहे. गेल्या वर्षी हा पराक्रम आर. प्रज्ञानंदाने केला होता. यंदा, १९ वर्षीय डी. गुकेश यांनी तीच कामगिरी करत इतिहास रचला. विशेष म्हणजे, गुकेश हे सध्या विश्वविजेते आहेत आणि त्यांनी प्रथमच क्लासिकल प्रकारात कार्लसनचा पराभव केला.
या लढतीत मॅग्नस कार्लसनने खेळाच्या बर्याच भागात वर्चस्व गाजवले. गुकेशच्या बाजूने खेळ जिंकण्याची फारशी शक्यता नव्हती. खुद्द गुकेशही म्हणाले की, "एक क्षण होता जेव्हा मी राजीनामा देण्याच्या विचारात होतो. पण शेवटपर्यंत खेळायचं ठरवलं." आणि शेवटी ६२ व्या चालीनंतर कार्लसनने पराभव मान्य करत राजीनामा दिला.
पराभवानंतर मॅग्नस कार्लसनने "ओ माय गॉड!" असे मोठ्याने ओरडले आणि चेस बोर्डवर संतापाने बुक्का मारला, त्यामुळे काही मोहरे उडाले. मात्र, गुकेशचा राजा अजूनही तसाच उभा राहिला होता जणू तोच त्या क्षणाचा साक्षीदार! त्यानंतर कार्लसनने गुकेशची दोनदा माफी मागितली आणि स्कोअरशीटवर सही करून त्यांच्या पाठीवर थोपटले, ही हार जड गेल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत कार्लसननेच गुकेशचा पराभव केला होता आणि त्यानंतर त्यांनी HBO मालिकेतील प्रसिद्ध संवाद ट्विट केला होता “You come at the king, you best not miss.” मात्र या सहाव्या फेरीत गुकेशनेच ‘राजा’ला चितपट करत जोरदार प्रत्युत्तर दिले.
जगविख्यात ग्रँडमास्टर सुसान पोल्गर यांनी या विजयाचे वर्णन करताना म्हटले, “कार्लसनने गुकेशला जवळपास हरवलं होतं, पण एका मोठ्या चुकेमुळे पराभव पत्करावा लागला. कार्लसन क्लासिकल फॉरमॅटमध्ये क्वचित हरतो आणि इतकी चूक तर अजून क्वचित. ही त्यांच्या करिअरमधील सर्वांत वेदनादायक हारांपैकी एक असू शकते.”
खेळ संपल्यावर गुकेश हादरलेला दिसला. कार्लसन निघून गेल्यानंतर त्यांनी मोहरे पुन्हा जागच्या जागी ठेवले आणि बाहेर येताच आपल्या प्रशिक्षक ग्रेजगोर्ज गाजेव्स्की आणि वडिलांना मिठी मारली गाजेव्स्की म्हणाले, “हा गुकेशकडून मिळालेला सर्वात कडक फिस्ट बंप होता!”
गुकेश यांच्यावर अनेकदा टीका केली जात होती की, ते ‘फक्त’ मॅग्नस कार्लसन स्पर्धेत सहभागी झाला नाही म्हणून वर्ल्ड चॅम्पियन झाले. पण आता त्यांनी स्वतः कार्लसनला हरवल्यामुळे या टीकांना जोरदार उत्तर दिलं आहे. कोच गाजेव्स्की म्हणाले, “हा विजय गुकीला आत्मविश्वास आणि योग्य तो सन्मान मिळवून देईल.”
या ऐतिहासिक विजयानंतर टीम गुकेशचं लक्ष आता त्यांच्या देशबांधव अर्जुन एरिगैसीवर आहे. क्लासिकल प्रकारात त्यांच्यावरही विजय मिळवणं हे पुढचं ध्येय आहे, असं कोच गाजेव्स्की यांनी सांगितलं.