

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचा तणाव वाढल्याने कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. आज शुक्रवारी कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल एक डॉलरहून अधिक वाढला. इराण येत्या काही दिवसात इराकच्या हद्दीतून इस्रायलवर हल्ला करण्याच्या (Iran Israel War) तयारीत आहे, असे वृत्त Axios ने दोन इस्रायली सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी इराकमधून हा हल्ला केला जाण्याची शक्यता आहे, असेही पुढे म्हटले आहे.
इराकमधील इराण पुरस्कृत मिलिशियाद्वारे हल्ला करणे हा इराणमधील लक्ष्यांवर इस्रायली हल्ला टाळण्यासाठीचा प्रयत्न असू शकतो, असेही वृत्तात नमूद केले आहे.
गेल्या शनिवारी, इस्त्रायली लष्करी विमानांनी तेहरानजवळील क्षेपणास्त्र निर्मिती कारखाने आणि पश्चिम इराणवर ऑक्टोंबरचा बदला म्हणून हल्ला केला होता. इराणने इस्रायलवरील हल्ल्यासाठी २०० हून अधिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितले होते की, इराण इस्रायलच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व उपलब्ध साधनांचा वापर करेल.
दरम्यान, मध्य पूर्वेत तणाव कायम आहे. हिजबुल्लाने उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू केले आहेत. मेतुला आणि हैफाजवळ झालेल्या रॉकेट हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे.
मध्य पूर्वेत पुन्हा तणाव वाढणार असल्याच्या शक्यतेने कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. जानेवारी कॉन्ट्रेक्ट ब्रेंट क्रूड फ्युचर्स १.३१ डॉलर म्हणजे १.८० टक्के वाढून ७४.१२ प्रति बॅरलवर पोहोचले. इस्रायलने इराणवर ऑक्टोबरमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाचे दर ६ टक्क्यांनी घसरले होते.