पुढारी ऑनलाईन डेस्क : हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू केले आहेत. द टाईम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, मेतुला आणि हैफाजवळील कृषी क्षेत्रात झालेल्या रॉकेट हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि.31) सकाळी सीमेवरील मेतुला शहराजवळ ही दुर्घटना घडली. लेबनॉनमधून उडवलेले रॉकेट सफरचंदाच्या बागेवर आदळले आणि पाच जणांचा मृत्यू झाला. काही तासांनंतर, हिजबुल्लाहने किरियत अताच्या हैफा उपनगराबाहेर डझनभर रॉकेट डागले आहेत. येथील ऑलिव्ह ग्रोव्हमध्ये आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. इस्त्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) देखील या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. आयडीएफनुसार, हिजबुल्लाहच्या हल्ल्यात सात निष्पाप इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्याची मोठी किंमत मोजावी लागेल अशी धमकीही इस्त्रायलने दिली आहे. हल्ल्याच्या वेळी सर्व शेतमजूर असून ते बागेत काम करत होते. एक नागरिक इस्रायली होता, तर इतर परदेशी नागरिक होते.
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या दरम्यान, इस्रायली सैन्याने गुरुवारी हिजबुल्लाहच्या रदवान सैन्याला आणि सीरियातील त्यांच्या लढाऊ युनिटला लक्ष्य केले. इस्रायली सैन्याने शस्त्रास्त्र साठवणूक केंद्रे आणि कमांड सेंटरला लक्ष्य केले. आयडीएफने सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे इस्रायली हवाई दलाने काही काळापूर्वी सीरियातील अल-कुसेर भागात हल्ले केले होते. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, लेबनॉनमध्ये शस्त्रास्त्रांचा साठा करण्यासाठी रडवान जबाबदार आहे. अलीकडेच त्याने सीरियन-लेबनीज सीमेजवळील अल-कुसैर शहरापर्यंत आपल्या क्रियाकलापांचा विस्तार केला आहे. सीरियातून सीमा ओलांडून लेबनॉनमध्ये शस्त्रास्त्रे तसेच रसद पुरवण्यासाठी हिजबुल्लाह पायाभूत सुविधा निर्माण करत आहे.
इस्रायली लष्कराने सांगितले की, हवाई हल्ल्यांदरम्यान हिजबुल्लाच्या युनिट 4400 च्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. हे युनिट इराणमधून सीरियामार्गे लेबनॉनमध्ये अवैध शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यासाठी जबाबदार आहे.