Iran President Death | इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूमागे ‘इस्त्रायल’चा हात? संशयाची सुई ‘मोसाद’कडे

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी.
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी (Iran President Ebrahim Raisi) यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये इब्राहिम रईसी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री हुसैन अमी अब्दुल्लाहियान यांच्यासह ९ जण होते. या अपघातातून कोणीही वाचले नसल्याची पुष्टी इराणच्या IRNA या सरकारी वृत्तसंस्थेने सोमवारी केली. दरम्यान, रईसी आणि अब्दुल्लाहियान यांचे मृतदेह सापडले आहेत. रईसी यांना घेऊन येणारे हेलिकॉप्टर रविवारी १९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता क्रॅश झाले होते. त्यानंतर सोमवारी त्यांचा घनदाट जंगलात मृतदेह सापडला.

इब्राहिम रईसी अझरबैजान सीमेला लागून असलेल्या एका धरणाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना त्यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले.

अन् इस्त्रायलची सुडाची भावना

याचदरम्यान या घटनेनंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. यामागे काहींनी इस्त्रायलचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पण अद्याप तसा काही पुरावा समोर आलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष सुरु आहे. याआधी इराणने इस्त्रायलवर एकामागून एक क्षेपणास्त्र हल्ले केले. पण इस्त्रायलने त्याला चोख प्रत्युत्तर देत इराणची सर्व क्षेपणास्त्रे हवेत नष्ट केली होती. याचदरम्यान इस्त्रायलने इराणला बदला घेणार असल्याचा इशारा दिला होता.

'मोसाद'चा हात असू शकतो का?

इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले होते. इस्त्रायल- गाझा युद्धादरम्यान इराण आणि इस्त्रायल यांच्यातही संघर्ष वाढला. अशात संशय व्यक्त केला जात आहे की हेलिकॉप्टर दुर्घटनेमागे इस्त्रायलची गुप्तचर एजन्सी मोसादचा हात असू शकतो. रईसी यांचा वादग्रस्त कार्यकाळ आणि इराणसमोरील अंतर्गत आणि बाह्य आव्हाने, देशांतर्गत शत्रू किंवा इस्रायलसारख्या बाहेरच्या देशाच्या संभाव्य सहभागाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इराण आणि इस्रायलमधील शत्रुत्व लक्षात घेता, काही इराणींनी असा संशय व्यक्त केला आहे की या अपघातामागे इस्रायलचा हात असू शकतो, असे इकॉनॉमिस्टच्या वृत्तात म्हटले आहे. इस्त्रायलने दमास्कसमधील इराणी जनरलची केलेली हत्या आणि इराणने त्यानंतर केलेला क्षेपणास्त्र हल्ला या घटना पाहता या हेलिकॉप्टर दुर्घटनेमागे इस्त्रायल हात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, धरणाचे उद्घाटन केल्यानंतर इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी इराणच्या तबरेज शहराच्या दिशेने जात होते. दरम्यान, हेलिकॉप्टरला केवळ ५० किलोमीटरचे अंतर पार करायचे होते. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो डोंगराळ भाग असून तेथे दाट धुके आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, येथे दाट धुक्यामुळे दृश्यमानताही ५ मीटरपेक्षा जास्त नव्हती. साधारणपणे हेलिकॉप्टर उड्डाणासाठी ८०० मीटरची दृश्यमानता असावी लागते.

अद्याप काही पुरावा नाही

अमेरिकेचे खासदार चक शूमर यांनी एक निवेदन जारी करत म्हटले आहे की त्यांनी एफबीआय या गुप्तचर एजन्सीशी चर्चा केली आहे. अद्याप कोणत्याही कटाचा संशय अथवा पुरावा सापडलेला नाही.

मोसाद आहे तरी काय?

इन्स्टिट्यूट फॉर इंटेलिजन्स अँड स्पेशल ऑपरेशन्स, ज्याला मोसाद म्हणून ओळखले जाते. ही इस्रायलची राष्ट्रीय गुप्तचर एजन्सी आहे. अमन आणि शिन बेटसह इस्त्रायली गुप्तचर यंत्रणेतील मुख्य घटकांपैकी एक आहे. मोसाद एजन्सी गुप्तचर माहिती गोळा करणे, गुप्त कारवाया करणे आणि दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी काम करते. ही जगातील सर्वात मोठ्या हेरगिरी संस्थांपैकी एक मानली जाते. मोसाद ही इस्रायलची गुप्तचर एजन्सी इराणी हितसंबंधांविरुद्धच्या कारवायांसाठी ओळखली जाते. पण त्यांनी कधीही राष्ट्रप्रमुखाला लक्ष्य केले नाही.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news