

Operation Sindoor
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ गयानाचा दौरा संपवून तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी पनामा शहरात दाखल झाले. या शिष्टमंडळाने पनामा शहरातील भारतीय सांस्कृतिक केंद्राला भेट दिली. तसेच त्यांनी पनामा विधानसभेच्या अध्यक्षांचीही भेट घेतली. त्यानंतर थरूर यांनी पनामातील भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी बोलताना, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले, "पुरुष पर्यटकांवर त्यांच्या पत्नीसमोरच गोळ्या झाडण्यात आल्या. आम्ही त्यांचा आक्रोश ऐकला. आमच्या महिलांचे ज्यांनी कुंकू पुसले; त्यांचा बदला घेण्यासाठी आम्ही ऑपरेशन सिंदूर राबवण्याचा निर्णय घेतला."
यावेळी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, "आमच्या पंतप्रधानांनी हे स्पष्ट केले आहे की ऑपरेशन सिंदूर राबवणे आवश्यक होते. कारण दहशतवादी आले आणि त्यांनी २६ महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसून टाकले. त्यांनी त्यांचे वैवाहिक जीवन हिरावून घेतले."
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तान सरकार या दहशतवाद्यांवर काहीतरी कारवाई करेल, याची आम्ही वाट पाहिली. पण पाकिस्तानने त्यावर कोणताही कारवाई केली नाही. त्यानंतर दोन आठवड्यांनंतर ७ मे रोजी, आम्ही पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. आम्हाला युद्ध सुरु करायचे नव्हते. पण, दहशतवादी कृत्याला शिक्षा देणे गरजेचे होते, असे थरुर म्हणाले.
दरम्यान, भारतीय शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर, पनामा विधानसभा अध्यक्षांनी भारताला पाठिंबा जाहीर केला. पनामा विधानसभेच्या अध्यक्षा डाना कास्टानेडा म्हणाल्या की, दहशतवादाविरुद्धच्या कारवाईत पनामाचा भारताला नेहमीच पाठिंबा राहील. जर आम्ही एकजूट राहिलो तर आपण दहशतवादाचा पराभव करू शकू.