

columbia earthquake many buildings collapsed death toll rises bomb blast like noise
पुढारी ऑनलाईन : कोलंबियामध्ये 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने मोठी हानी झाली आहे. वृत्तांनुसार, भूकंपाच्या वेळी लोकांना बॉम्बस्फोटासारखा मोठा आवाज ऐकू आला आणि मोठमोठ्या इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागल्या.
पश्चिम कोलंबियामध्ये सोमवारी आलेल्या शक्तिशाली भूकंपानंतर मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत एकूण 111 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 इतकी होती. या भूकंपामुळे हजारो इमारतींचे नुकसान झाले असून, शेकडो इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे.
पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे इमारती कोसळल्या
राष्ट्राध्यक्ष अबेलार्डो दे ला एस्प्रिएला यांनी आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. त्यामुळे भूकंपानंतर मदत आणि पुनर्वसनासाठी निधी वेगाने उपलब्ध करून देता येणार आहे. त्यांनी आपत्तीग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचे सांगितले.
कोलंबियामध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. वृत्तांनुसार, भूकंपामुळे शहरातील अनेक उंच इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. या भूकंपाचे धक्के शेजारील व्हेनेझुएला आणि इक्वाडोर या देशांमध्येही जाणवले.
कुठे होते भूकंपाचे केंद्र?
अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) आणि कोलंबियाच्या संबंधित संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र सॅन होसे डेल पाल्मार येथे होते. हे ठिकाण कोलंबियाची राजधानी बोगोटापासून सुमारे 400 किलोमीटर पश्चिमेला चोको भागात आहे. USGSच्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे 107 किलोमीटर खोलीवर होता.
भूकंपानंतर आफ्टरशॉक्सचे धक्के
कोलंबियाच्या भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षणानुसार, गेल्या दशकात देशात नोंदवला गेलेला हा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. भूकंपानंतर 2.8 आणि 4.8 रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन आफ्टरशॉक्सही जाणवले.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, भूकंपाच्या वेळी बॉम्बस्फोटासारखा मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर जमीन हादरू लागली आणि इमारती कोसळू लागल्या. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पेरेइरा शहरात किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर मनीजालेस येथे दोन जणांचा जीव गेला. वाले देल काउका येथे 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
चर्चचा टॉवर कोसळला
मनीजालेस शहरातील एका चर्चचा टॉवर कोसळून तो मुख्य प्रार्थना कक्षावर पडला. चोकोच्या गव्हर्नर नुबिया कॉर्डोबा यांनी सोशल मीडियावर सांगितले की, प्रादेशिक राजधानी क्विब्दो येथे अनेक जण जखमी झाले असून इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.
स्थानिक माध्यमांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पेरेइरा, काली आणि क्विब्दो शहरांमधील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.