

Chuck Mangione death
न्यूयॉर्क : दोन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार चक मँजिओनी यांचे निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. १९७७ मध्ये आलेल्या 'फील्स सो गुड' या जॅझ शैलीतील गाण्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. पुढे त्यांनी 'किंग ऑफ द हिल' या प्रसिद्ध ॲनिमेटेड टीव्ही कॉमेडी मालिकेत व्हॉईस ॲक्टर म्हणूनही काम केले.
त्यांचे सर्वात प्रसिद्ध गाणे 'फील्स सो गुड' हे आजही बहुतेक स्मूथ-जॅझ रेडिओ स्टेशन्सवर नियमितपणे वाजवले जाते. 'बीटल्स'च्या 'मिशेल' गाण्यानंतरची ही सर्वात जास्त ओळखली जाणारी सुरावट मानली जाते. या गाण्याने बिलबोर्ड हॉट १०० चार्टवर चौथे स्थान आणि बिलबोर्डच्या ॲडल्ट कंटेम्पररी चार्टवर अव्वल स्थान पटकावले होते. या गाण्याच्या यशाबद्दल बोलताना मँजिओनी यांनी २००८ मध्ये 'पिट्सबर्ग पोस्ट-गॅझेट'ला सांगितले होते, "जरी माझा स्वतःचा एक मोठा चाहतावर्ग होता, ज्यामुळे आम्ही दौरे करत राहिलो, तरी त्या एका गाण्याने माझी आणि माझ्या संगीताची ओळख जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवली. त्या गाण्याने माझ्या कारकिर्दीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले." या हिट गाण्यानंतर त्यांनी 'गिव्ह इट ऑल यू गॉट' (Give It All You Got) हे गाणे संगीतबद्ध केले, जे लेक प्लॅसिड येथील १९८० च्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी खास तयार करण्यात आले होते. या ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात त्यांनी हे गाणे सादरही केले होते. फ्लुगेलहॉर्न आणि ट्रम्पेट वादक तसेच जॅझ संगीतकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मँजिओनी यांनी आपल्या कारकिर्दीत ३० हून अधिक अल्बम रिलीज केले. २०१५ पासून ते संगीत क्षेत्रातून निवृत्त झाले होते.
त्यांना पहिला ग्रॅमी पुरस्कार १९७७ मध्ये त्यांच्या आईच्या सन्मानार्थ तयार केलेल्या 'बेलाव्हिया' या अल्बमसाठी मिळाला होता. त्यांचा 'फ्रेंड्स अँड लव्ह' हा अल्बमदेखील ग्रॅमीसाठी नामांकित झाला होता. 'द चिल्ड्रन ऑफ सँचेझ' या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट मूळ संगीतासाठी गोल्डन ग्लोब नामांकन आणि दुसरा ग्रॅमी पुरस्कार मिळाला.
मँजिओनी यांनी 'किंग ऑफ द हिल' या प्रसिद्ध ॲनिमेटेड मालिकेच्या सुरुवातीच्या काही सीझनमध्ये भूमिका साकारून नव्या पिढीतील प्रेक्षकांमध्येही आपली ओळख निर्माण केली. यात त्यांनी 'मेगा लो मार्ट'साठी एका प्रवक्त्याची भूमिका साकारली होती, जिथे "शॉपिंग फील्स सो गुड" (खरेदी करताना खूप छान वाटते) ही टॅगलाईन होती.