

China Propaganda Against Rafale
चीनचा आणखी एक खोडसाळपणा उघड झाला आहे. भारताने राबविलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर चीनने त्यांच्या दूतावासांच्या माध्यमातून फ्रान्सच्या अत्याधुनिक राफेल विमानांविरोधात जागतिक स्तरावर अप्रचार करण्याचा प्रयत्न केला. या विमानांविरुद्ध त्यांनी चुकीची माहिती पसरवण्यासाठी मोहीम चालवली, असे वृत्त असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेने फ्रान्सच्या लष्करी आणि गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.
राफेलच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याच्या उद्देशाने चीनने फ्रान्स बनावटीची लढाऊ विमाने खरेदी करू नयेत, अशी जागतिक स्तरावर मोहीम राबवली. त्यांनी चीन बनावटीची विमाने खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला, असे एका फ्रान्सच्या लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यादरम्यान चीनशी जवळचे संबंध असलेल्या पाकिस्तानने तीन राफेल विमाने पाडल्याचा दावा केला होता. त्यानंतर, राफेल विमानांची निर्मिती करणारी फ्रान्सची कंपनी दसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी पाकिस्तानचा हा दावा चुकीचा असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता काही दिवसांनी चीनने केलेला खोडसाळपणा उघड झाला आहे.
राफेल विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टॉफ जनरल अनिल चौहान यांनीही फेटाळून लावला होता. त्यांचा हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
फ्रान्सच्या गुप्तचर संस्थेच्या मूल्यांकनानुसार, चीन दूतावासाच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी असा दावा केला की भारतीय हवाई दलातील राफेल विमानांनी खराब कामगिरी केली. त्यांनी इतर देशांच्या सुरक्षा आणि संरक्षण अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकांमध्ये चीन बनावटीची शस्त्रास्त्रे कशी प्रभावी आहेत? याबाबत प्रचार केला, असे असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तात पुढे म्हटले आहे.
फ्रान्सच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चीनने सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट, कथित राफेल विमानांचे अवशेष दर्शवणारे फोटो, AI-जनरेटेड कंटेंटचा वापर करत अपप्रचार केल्याचे आढळून आले आहे.
फ्रान्समधील संशोधकांच्या मते, भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान नव्याने तयार केलेल्या १ हजारहून अधिक सोशल मीडिया अकाउंट्सच्या माध्यमातून चीन तंत्रज्ञान कसे वरचढ आहे? असे नॅरेटिव्ह पसरवण्यात आले.