

नवी दिल्ली : देपसांग आणि देमचोक भागातून भारताने आपले सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी त्यात चीनची कावेबाजी नव्याने समोर आली आहे. उभय देशांत झालेल्या सहमतीनुसार तेथून चीनने आपले सैन्य मागे घेणे गरजेचे होते. मात्र त्यांनी सैन्य हटवण्याचा केवळ देखावा निर्माण केला. प्रत्यक्षात पेंगाँग सरोवरासह अन्य भागांत चीनने सैन्य तळांसाठी बांधकामे चालवल्याचे सॅटेलाईट छायाचित्रांच्या माध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
उभय देशांतील तणाव कमी होऊ लागल्याचा निर्वाळा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला संसदेत दिला होता. तसेच भविष्यात दोन्ही देशांदरम्यान कोणतीही चकमक उडू नये यासाठी सैन्य माघारीची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्याचेही जयशंकर यांनी स्पष्ट केले होते.
सीमेवरील तणाव कमी करण्यासंदर्भात दोन्ही देशांत फलदायी चर्चा झाल्यानंतर ठरलेल्या भागांतून भारताने आपले सैन्य मागे घेतले. मात्र, भारताला चीनकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे दिसू लागले आहे. याचे कारण म्हणजे पेंगाँग सरोवराच्या उत्तरेकडील किनार्यावर चीनने सैन्य तळांसाठी मजबूत बांधकामे उभारण्याचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे शांततामय वातावरण निर्माण करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात विविध पातळ्यांवर चर्चा सुरू असताना चीनकडून हा आततायीपणा केला जात आहे.
देपसांग भागात चीनने सुरुवातीला आपण सैन्य माघार घेत असून, तो परिसर मोकळा करत असल्याचा देखावा निर्माण केला. मात्र, चिनी सैन्य अर्थात त्यांच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने देपसांग आणि देमचोक या दोन्ही ठिकाणी नव्याने आपले तळ उभारले आहेत. या ठिकाणी मे 2020 सारखी स्थिती निर्माण करण्यावर दोन्ही देशांत सहमती झालेली आहे. त्यावेळी दोन्ही देशांकडून या परिसरातील निर्मनुष्य टापूत गस्त घातली जात होती. थोडक्यात, चीनने दोन पावले माघार घेताना आपली स्थिती आणखी भक्कम केल्याचे दिसून येते.
सिरीजाप आणि खुरनाक हे दोन्ही भाग लडाखचा हिस्सा असल्याचे भारत मानत आला आहे. मात्र, तो भागसुद्धा चीनने आपलाच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे भविष्यात चीनशी नव्याने लष्करी पातळीवर वाटाघाटी करताना भारताला विशेष सावधगिरी बाळगावी लागेल, असे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
एकीकडे शांततेचा जप करतानाच दुसरीकडे भारताला बेसावध ठेवून अधिकाधिक भाग आपल्या टाचेखाली आणणे हेच चीनचे सामरिक धोरण राहिले आहे. त्याचा भारताने प्रभावीपणे मुकाबला करणे गरजेचे आहे.
- अजय रैना, सेवानिवृत्त कर्नल