

China claims Ladakh region India : लडाखवरून पुन्हा एकदा चीनने आदळआपट सुरू केली आहे. आज (दि. १३ ऑक्टोबर) चीनने केवळ लडाखमधील २८ मोक्याची ठिकाणे आणि भौगोलिक क्षेत्रांना प्रमाणित नावे देण्याच्या भारताच्या निर्णयाला कडाडून विरोधच केला नाही, तर संपूर्ण लडाख प्रदेश आपलाच असल्याचा बालिश दावाही केला आहे.
बीजिंगमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग म्हणाल्या, "भारताने एकतर्फी आणि बेकायदेशीरपणे स्थापन केलेल्या तथाकथित 'लडाख केंद्रशासित प्रदेशाला' चीनने कधीही मान्यता दिलेली नाही."
भारताने 'एकतर्फी' आणि 'बेकायदेशीर' पद्धतीने लडाखवर ताबा मिळवला आहे. भारताने जाहीर केलेल्या या तथाकथित प्रमाणित नावांना चीनचा तीव्र विरोध आहे. लडाखमधील २८ ठिकाणे आणि भौगोलिक क्षेत्रांसाठी भारताच्या गृह मंत्रालयाने निश्चित केलेल्या नावांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला माओ उत्तर देत होत्या. त्या म्हणाल्या, "हे पाऊल बेकायदेशीर आणि अवैध आहे. भारत-चीन सीमेच्या पश्चिम भागात असलेली ही संबंधित क्षेत्रे नेहमीच चीनची राहिली आहेत, ही वस्तुस्थिती या निर्णयामुळे बदलू शकत नाही," अशी शेखीही त्यांनी मिरवली.
२ ऑक्टोबर रोजी भारताने लडाखमधील २८ मोक्याची ठिकाणे आणि भौगोलिक वैशिष्ट्ये अधिकृतपणे निश्चित केली. यामध्ये 'लाइन ऑफ ॲक्चुअल कंट्रोल' (LAC) जवळील वादग्रस्त सीमाभागातील 'गोगरा' आणि 'हॉट स्प्रिंग्स'सारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. ही ठिकाणे भारताच्या अधिकृत नकाशात समाविष्ट करण्यात आली आहेत. लडाख प्रशासनाच्या सल्ल्याने सरकारने घेतलेल्या या उपक्रमाचा उद्देश अधिकृत नकाशांकन सुलभ करणे, ठिकाणांची अचूक ओळख सुनिश्चित करणे आणि या संवेदनशील सीमाभागाबाबत जनजागृती करणे हा आहे. यात गोगरा आणि हॉट स्प्रिंग्सचा समावेश आहे.
गोगरा आणि हॉट स्प्रिंग्स ही मोक्याची ठिकाणे आहेत. २०२० मध्ये भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या काळात ही ठिकाणे संघर्षाची केंद्रे ठरली होती. 'लाइन ऑफ ॲक्चुअल कंट्रोल' (LAC) जवळ भारतीय सैन्याच्या गस्तीसाठी ही क्षेत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. पूर्व लडाखमधील सीमावाद ५ मे २०२० रोजी पँगॉन्ग त्सो भागात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर सुरू झाला. दोन्ही बाजूंनी २०२२ मध्ये सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू केली.
भारताने चिन्हांकित केलेल्या इतर ठिकाणांमध्ये अलीशा गिरी पीक, ब्रांगसा, चापचिंगल पास, कनिष्क पीक, करुण पीर पर्वत, कुकसेल, मार्तंड गिरी, पारपिक हिमनदी, स्कमरी हिमनदी, शचमिरीक पास, शाकोरगा दरी, झोरावर पीक, डेहरा कंपास आणि ड्रॅक कार्पो यांचा समावेश आहे. या यादीत जलमोरी, कुमारयन पॉइंट, पांगलुंग, रिंचेन जांगपो, साक्यश्री गिरी, गुरू रिंपोचे, शामल लुंग्पा (१९५० च्या दशकात गस्त आणि सैन्याच्या हालचालींसाठी वापरला जाणारा मार्ग), यांगपा नदी, मारपा लोत्सावा री, मिलारेपा कांग्री, शिव री आणि महेश्वर री यांचाही समावेश आहे.