California terror attack Palm Springs fertility clinic blast |
कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियातील पाम स्प्रिंग्ज शहरात शनिवारी सकाळी एका फर्टिलिटी क्लिनिकच्या बाहेर बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. या घटनेला एफबीआयने अधिकृतपणे दहशतवादी कृत्य घोषित केले आहे.
पाम स्प्रिंग्ज शहराच्या मध्यभागी सकाळी ११ वाजता (स्थानिक वेळेनुसार) स्फोट झाला, ज्यामुळे अनेक इमारतींच्या खिडक्या फुटल्या, अमेरिकन रिप्रोडक्टिव्ह सेंटर्सच्या इमारतीचा काही भाग कोसळला. हा स्फोट क्लिनिकच्या पार्किंग जवळ असलेल्या एका वाहनातून झाला. घटनास्थळी फक्त जळालेल्या कारचा अॅक्सल शिल्लक होता. मृत व्यक्ती कारजवळ होती, त्याची ओळख जाहीर केलेली नाही. Associated Press (AP) च्या च्या वृत्तानुसार, मृत व्यक्तीच स्फोट घडवणारा हल्लेखोर असावा, असा प्राथमिक संशय आहे. घटनास्थळावरून एके-४७ रायफल देखील जप्त करण्यात आली आहे.
एफबीआयच्या लॉस एंजेलिस कार्यालयाचे प्रमुख अकील डेव्हिस यांनी घटनास्थळी माध्यमांशी बोलताना, “ही घटना दहशतवादी कृत्य आहे. दक्षिण कॅलिफोर्नियामधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बॉम्बस्फोट प्रकरणांपैकी ही एक आहे.” असे सांगितले. या हल्ल्याचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही, मात्र क्लिनिक लक्ष्य करूनच हा स्फोट करण्यात आला, असेही डेव्हिस यांनी स्पष्ट केले. हल्ला देशांतर्गत होता की आंतरराष्ट्रीय, यावर एफबीआयनं अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
स्फोटाची तीव्रता प्रचंड होती, स्फोटानंतर पाच लेनच्या रस्त्यावर ढिगारा पसरला होता. रुग्णालयासह जवळच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, क्लिनिकमधील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. गर्भ आणि पुनरुत्पादक साहित्य साठवणाऱ्या प्रयोगशाळेला कोणतेही नुकसान झाले नाही. "देवाचे आभार, आज असा दिवस आला की आमच्याकडे एकही रुग्ण नाही," असे क्लिनिकचे डॉ. माहेर अब्दुल्लाह यांनी सांगितले.