Treasure Find in Belgium : गटार साफ करताना तरुणाला सापडला ९८ कोटींचा सोन्याचा खजिना! बेल्जियममधील थक्क करणारी घटना!

तरुणाने प्रामाणिकपणे केले सोने शासनाकडे सुर्पूद : बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सजवळील घटना
Treasure Find in Belgium
Treasure Find in Belgium
Published on
Updated on

Treasure Find in Belgium : बेल्जियम येथे एका जुन्या इमारतीतील गटाराची पाईपलाईन दुरुस्त करत असताना एका १८ वर्षीय तरुणाला तब्बल १०० ते १२० वर्षे जुना आणि अंदाजे ९८ कोटी रुपयांचा सोन्याचा खजिना हाती लागला. पण या तरुणाने सोन्याचा मोह आवरत प्रामाणिकपणे सापडलेला संपूर्ण खजिना तातडीने प्रशासनाच्या स्वाधीन केला आहे. ही घटना ऑगस्ट महिन्यात घडली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या 'सेंट-गिलीस-डेंटरमुंडे' परिसरातील एका जुन्या रस्त्यावर गटाराची पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू होते. यावेळी कोबे (Kobe) नावाचा १८ वर्षांचा तरुण विद्यार्थी आपल्या सहकाऱ्यांसोबत तिथे काम करत होता. खोदकाम सुरू असताना कोबेला जमिनीखाली अचानक काहीतरी चमकताना दिसले. सुरुवातीला ते १ युरोचे साधे नाणे असावे असा त्याचा अंदाज होता; मात्र जवळ जाऊन पाहिले असता तिथे सोन्याची नाणी आणि सोन्याच्या विटांचा प्रचंड साठा असल्याचे उघड झाले.

जुन्या इमारतीच्या तळघरातील भिंतीत दडवला होता खजिना

ज्या ठिकाणी हा खजिना सापडला, तिथे १८९९ मध्ये प्रसिद्ध बिअर उत्पादक थियोफिलिस व्हॅन एशे यांनी एक मोठ्या आकाराची गोडाऊन सारखी कोठी उभारली होती. १९७० पर्यंत या जागेत बिअर उत्पादनाचे कामकाज चालत असे. आजही ही इमारत उभी असून सध्या या ऐतिहासिक वास्तूच्या पुनर्विकासाचे काम एका संस्थेकडून सुरू आहे. याच कामाचा भाग म्हणून येथील गटार साफ करण्याचे काम कोबे व त्‍याचे मित्र करत होते. यावेळी या इमारतीच्या तळघराच्या भिंतीमध्ये एका मोठ्या पिशवीत नंबर कोरलेल्या सोन्याच्या विटा आणि प्राचीन सोन्याची नाणी लपवून ठेवण्यात आली होती. ती गटार साफ करताना दिसून आली.

जमिनीखाली कोट्यवधी रुपयांचे सोनं सापडल्याची बातमी पसरताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत संपूर्ण परिसर सील केला. सुरक्षेच्या कारणास्तव हा ९८ कोटी रुपयांचा खजिना ब्रुसेल्समधील एका सुरक्षित सरकारी लॉकरमध्ये हलवण्यात आला आहे. दरम्यान, डोळे पांढरे करणारा खजिना समोर दिसल्यानंतरही कोणताही मोह न बाळगता संपूर्ण सोनं प्रशासनाकडे जमा करणाऱ्या कोबेच्या प्रामाणिकपणाचे मोठे कौतुक होत असून, त्याला आता सरकारकडून काय बक्षीस मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news