पुढारी ऑनलाईन डेस्क
बांगला देशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी (Bangladesh Chief Justice Resigns) शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. संतप्त आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला आणि त्यांना तासाभरात राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर ओबेदुल हसन सरन्यायाधीश पदावरुन पायउतार झाले. बांगला देशचे संसदीय कामकाज सल्लागार आसिफ नजरुल यांनी या घडामोडीला दुजोरा दिला आहे. सरन्यायाधीशांचा राजीनामा कायदा मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे, असे वृत्त बांगला देशमधील द डेली स्टारने दिले आहे.
"मला एक विशेष बातमी तुमच्यासोबत शेअर करणे आवश्यक आहे असे वाटते. आमच्या सरन्यायाधीशांनी काही मिनिटांपूर्वीच राजीनामा दिला आहे. त्यांचे राजीनामा पत्र कायदा मंत्रालयात पोहोचले आहे. आम्ही आवश्यक उपाययोजना करण्यासाठी विलंब न करता राजीनामा पत्र राष्ट्रपतींकडे पाठवू," असे आसिफ नजरुल यांनी फेसबुक पोस्टवरील व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.
शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतरही बांगला देशमधील आंदोलनाचे सत्र सुरूच आहे. आज (दि. १० ऑगस्ट) आंदोलकांनी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली असल्याचे वृत्त 'द डेली स्टार'ने दिले होते. निदर्शनादरम्यान आंदोलकांनी मुख्य न्यायाधीश आणि अपील विभागाला दुपारी १ वाजेपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी करत राजीनामा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि सरन्यायाधीशांच्या निवासस्थानावर धडक देऊ, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. (The mass protests in Bangladesh)
आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत विद्यार्थी आणि वकिलांसह शेकडो आंदोलक सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलात जमा झाले. निदर्शनादरम्यान त्यांनी सरन्यायाधीश आणि अपील विभागाला राजीनामा देण्याचा इशारा दिला.सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी दिलेल्या मुदतीत राजीनामा न दिल्यास त्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. बांगलादेशमध्ये आंदोलकांनी न्यायालय परिसराला घेराव घातल्यानंतर सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली.