

ढाका : बांगलादेशातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी' (बीएनपी) ने भारताशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बीएनपीचे वरिष्ठ नेते आणि कायदेशीर विभागाचे सचिव केसर कमाल यांनी म्हटले की, 'बीएनपी हा असा राजकीय पक्ष आहे जो सर्वांशी मैत्री ठेवण्यावर विश्वास ठेवतो आणि कोणाशीही वैर न ठेवण्याच्या विचारधारेवर चालतो. हीच आमच्या संस्थापक अध्यक्ष, माजी राष्ट्रपती शहीद झियाउर रहमान यांची नीती होती. भारत आमचा एक मोठा शेजारी देश आहे. आम्ही त्याच्याशी प्रतिष्ठा, मैत्री आणि एकता जपत सर्वांसोबत मिळून काम करू इच्छितो.'
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना केसर कमाल म्हणाले की, बांगलादेशात सध्या राजकीय पक्षांमध्ये आपापसात मतभेद असले तरी, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार देशात मुक्त, निःपक्षपाती आणि सर्वसमावेशक निवडणुका घेण्यात यशस्वी होईल, अशी आशा आहे. ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर मोहम्मद युनूस सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्याने सरकार चालवत आहेत. सर्व पक्षांनी एकमताने मोहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्याची विनंती केली होती. बीएनपीला विश्वास आहे की अंतरिम सरकार निःपक्षपाती आणि मुक्त निवडणुका घेण्यात यशस्वी होईल.'
बीएनपी पक्ष बहुपक्षीय राजकीय व्यवस्थेवर विश्वास ठेवतो, असेही केसर कमाल यांनी सांगितले. ते म्हणाले, सध्या अवामी लीगवर राजकीय कार्यवाही स्थगित आहे आणि तो कार्यकारी सरकारचा निर्णय आहे. मात्र, एक राजकीय पक्ष म्हणून बीएनपीचा नेहमीच बहुपक्षीय राजकीय व्यवस्था आणि लोकशाहीवर विश्वास आहे. माजी पंतप्रधान आणि बीएनपी नेत्या खालेदा झिया यांच्या प्रकृतीविषयी केसर म्हणाले, बेगम खालेदा झिया यांच्या नेतृत्वाखाली बीएनपी केवळ देशातीलच नव्हे, तर संपूर्ण उपखंडातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षांपैकी एक बनला. तथापि, त्यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरच अधिक चांगले सांगू शकतील.'
अवामी लीगच्या सरकारमध्ये अल्पसंख्याकांवर जास्त अत्याचार झाले. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशात परत येऊन न्यायप्रक्रियेला सामोरे जावे, असेही बीएनपीने म्हटले आहे. त्यांच्यावर आंदोलनादरम्यान दोन हजार निरपराध लोकांच्या हत्येचा आरोप आहे. त्यांनी असेही नमूद केले की, बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचा मुद्दा उचलला जात आहे, परंतु अवामी लीगच्या सरकारमध्ये हिंदूवर अधिक अत्याचार झाले. हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटनांवर ते म्हणाले की, अवामी लीगचे नेते किंवा समर्थक असल्याने त्यांच्यावर हल्ले झाले, यात हिंदू-मुस्लिम असे काहीही नाही.