Ayatollah Ali Khamenei Funeral: अयातुल्लाह खामेनी यांच्या अंत्यविधीला भारताचे प्रतिनिधी राहणार उपस्‍थित

बिहारच्‍या राज्‍यपालांसह परराष्‍ट्र व्‍यवहार राज्‍यमंत्री मार्गेरिटा अत्‍यंसंस्‍कार विधीत होणार सहभागी
Ayatollah Ali Khamenei Funeral
Ayatollah Ali Khamenei FuneralPudhari
Published on
Updated on

Ayatollah Ali Khamenei Funeral : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात भारताचे प्रतिनिधी सहभागी होणारआहेत. इराणी सूत्रांच्या हवाल्याने 'एएनआय'ने (ANI) दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारच्या वतीने बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा हे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.४ जुलै ते ९ जुलै या कालावधीत इराणमधील विविध शहरांमध्ये होणाऱ्या या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमांना लाखो नागरिक आणि अनेक परदेशी मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

२८ फेब्रुवारी रोजी झालेल्‍या हल्‍ल्‍यात खोमेनी यांचा झाला होता मृत्‍यू

इराणचे सर्वोच्च नेते राहिलेले अयातुल्ला खामेनी यांचा २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांचे अंत्यसंस्कार पुढे ढकलण्यात आले होते. आगामी ४ जुलै रोजी खामेनी यांच्‍या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या काळात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका भव्य समारंभाचे आयोजनही करण्यात आले असून, यात अनेक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

Ayatollah Ali Khamenei Funeral
Narendra Modi tour | धावत्या भेटीतला मास्टरस्ट्रोक

व्यस्त आंतरराष्ट्रीय दौर्‍यांमुळे PM नरेंद्र मोदी जाऊ शकणार नाहीत

पंतप्रधान मोदी स्वतः तेहरानला जाणार का? याबाबत कूटनीतिक वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आता त्यांच्या न जाण्याचे कारण स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पूर्वनियोजित आणि अत्यंत व्यस्त आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमुळे इराणला जाऊ शकणार नाहीत. पीएम मोदी लवकरच इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर जाणार असून, त्याचे वेळापत्रक आधीच निश्चित झाले आहे.

राज्यपाल हसनैन आणि पबित्र मार्गेरिटा यांच्यावर मोठी जबाबदारी

भारत सरकारने आपल्या या शिष्टमंडळाची निवड अत्यंत विचारपूर्वक केली आहे. बिहारचे राज्यपाल हसनैन हे भारतीय लष्कराचे अत्यंत सन्माननीय माजी अधिकारी आहेत. त्यांना पश्चिम आशियाई घडामोडी आणि दहशतवादविरोधी रणनीतीचा प्रदीर्घ व सखोल अनुभव आहे. त्यांची ही निवड भारताची या विषयातील धोरणात्मक गांभीर्य दर्शवते. दुसरीकडे, परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून मार्गेरिटा यांची निवड इराणसोबतच्या भारताच्या कूटनीतिक वचनबद्धतेचा थेट संकेत देते.

भारताने व्यक्त केला होता शोक

भारत इराणला आपला एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक भागीदार मानतो. खामेनी यांच्या मृत्यूनंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी इराणच्या दूतावासात जाऊन शोक व्यक्त केला होता. ४० दिवस चाललेल्या भीषण युद्धादरम्यानही पीएम मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर इराणच्या नेतृत्वाशी सातत्याने संपर्कात होते. नुकतेच ब्रिक्स (BRICS) बैठकीसाठी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची स्वतः नवी दिल्लीत आले होते. २०२४ मध्ये इराणचे तत्कालीन अध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या हेलिकॉप्टर अपघातात झालेल्या मृत्यूनंतर भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते.

Ayatollah Ali Khamenei Funeral
Ali Khamenei Funeral Date : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनींवर तब्बल १३२ दिवसांनी होणार अंत्यसंस्कार!

४ जुलैपासून अंत्यसंस्‍कार विधी

४ जुलैपासून खामेनी यांचे पार्थिव तेहरानच्या 'ग्रँड मोसल्ला कॉम्प्लेक्स'मध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल. त्यानंतर तेहरान आणि पवित्र शहर 'कोम'मध्ये विशाल जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्ययात्रा काढण्यात येतील. त्यानंतर ९ जुलै रोजी खामेनी यांचे मूळ गाव मशहद येथील पवित्र 'इमाम रझा दर्गा' येथे त्यांच्या पार्थिवाचे दफन (सुपूर्द-ए-खाक) केले जाईल. या काळात इराणमध्ये लाखो लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, इराक, रशिया आणि चीनचे प्रतिनिधीही या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news