
पुढारी ऑनलाईन डेस्क : नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स हे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांनी बोईंग स्टारलाइन्स अंतराळयान ५ जून रोजी अंतराळात झेपावले. या घटनेला १५० हून अधिक दिवस झालेत. ५ महिन्यांनंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचे अंतराळातील नवीन छायाचित्रे समोर आले आहे. या छात्राचित्रात सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांचे वजन कमालीचे घटल्याचे दिसत आहे. यावर अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था (NASA) ने त्यांच्या प्रकृतीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
अंतराळातील सुनीता विल्यम्स यांचे समोर आलेले छायाचित्र पाहून संशोधन संस्थेला देखील धक्का बसला आहे. कारण नवीन छायाचित्रांमध्ये सुनीता अतिशय अशक्त झाल्या असून, त्यांचे वजन कमालीचे घटल्याचे दिसत आहे. नासा त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सुनीता विल्यम्स जूनपासूनच अवकाशात आहेत.
नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स हे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्यासह जूनच्या पहिल्या आठवड्यात आठ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले आहेत. परंतु बोईंग स्टारलाइन्समध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विल्यम्स आणि बुचर यांना १५० दिवसांपेक्षा जास्त काळ तेथे राहावे लागले आहे. दरम्यान, नासाने दोन्ही अंतराळवीर पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पृथ्वीवर परत येऊ शकतील, अशी शक्यता वर्तवली आहे.
अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाच्या स्त्रोतांनी न्यूयॉर्क पोस्टला सांगितले की," सुनीता विल्यम्स यांचे सध्याचे छायाचित्र पाहून त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंतेचे वातावण निर्माण झाले आहे. त्यांचे वजन कमालीचे घटले आहे. त्यामुळे त्यांचे वजन पुर्वपदावर आणणे हे नासाचे प्राधान्य आहे".
नासाचे डॉक्टर एक महिन्यांहून अधिककाळ विल्यम्स यांच्या कमी झालेल्या वजनावर काम करत आहेत. अंतराळातील चयापचयातील बदलांमुळे पुरूष अंतराळवीरांपेक्षा महिला अंतराळवीरांचे स्नायू अधिक लवकर कमकूवत होतात, हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. विल्यम्स यांचा चेहरा हा “अवकाशात उंचावर राहण्यामुळे निर्माण होणारा ताण दर्शवत असल्याचे देखील नासाच्या डॉक्टरांनी म्हटले आहे.
बोईंग स्टारलाइन्स प्रक्षेपणावेळी सुनीता विल्यम्स यांचे वजन सुमारे 140 पौंड होते. अंतराळ जीवनातील उच्च भौतिक गरजा संतुलित करण्यासाठी आवश्यक असलेल्या 3,500 ते 4,000 कॅलरीजचे दैनिक सेवन पूर्ण करण्यासाठी अंतराळवीर धडपडत आहे. नासाच्या कर्मचाऱ्याने स्पष्ट केले. वजनहीन वातावरणात स्नायू आणि हाडांचे वस्तुमान टिकवून ठेवण्यासाठी दररोज दोन तासांपेक्षा जास्त व्यायाम करावा लागतो, ज्यामुळे अतिरिक्त कॅलरी बर्न होतात, असेही नासाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील (ISS) अंतराळवीर नियमित आरोग्य तपासणी करतात. एका समर्पित फ्लाइटद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याच्यावर लक्ष ठेवले जात आहे. वजन घटले असले तरी त्याची प्रकृती चांगली आहे, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.