

Asim Munir
रावळपिंडी: पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची कन्या महनूर हिचा विवाह २६ डिसेंबर रोजी रावळपिंडी येथील लष्कराच्या जनरल हेडक्वार्टरमध्ये अत्यंत कडक सुरक्षेत पार पडला. विशेष म्हणजे, जनरल मुनीर यांनी आपल्या मुलीचा विवाह स्वतःच्याच सख्ख्या भावाच्या मुलाशी (पुतण्याशी) लावून दिला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव हा विवाह सोहळा प्रसिद्धी माध्यमांपासून दूर ठेवण्यात आला होता. या सोहळ्याचे कोणतेही अधिकृत फोटो किंवा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले नाहीत. मात्र, पाकिस्तानी पत्रकार झाहीद गिश्कोरी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. जनरल मुनीर यांच्या चार मुलींपैकी ही तिसरी मुलगी आहे.
या निकाहसाठी सुमारे ४०० खास निमंत्रितांना बोलावण्यात आले होते. यामध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी, पंतप्रधान शहबाज शरीफ, उपमुख्यमंत्री इशाक दार, पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज आणि आयएसआय प्रमुखांसह अनेक आजी-माजी लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश होता.
जनरल मुनीर यांचा जावई आणि पुतण्या अब्दुल रहमान कासिम हा यापूर्वी पाकिस्तान लष्करात कॅप्टन पदावर कार्यरत होता. लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्याने लष्करी कोट्यातून नागरी सेवेत प्रवेश केला. सध्या तो प्रशासनात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहे.
लग्नाच्याच दिवशी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान हे पाकिस्तानात दाखल झाले होते. त्यामुळे ते या लग्नाला उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. विमानतळावर त्यांनी जनरल मुनीर यांच्याशी प्रदीर्घ चर्चाही केली. मात्र, अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दौरा खासगी होता आणि ते लग्नाच्या सोहळ्याला उपस्थित नव्हते.