

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या भगिनी आलिमा खान यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मुनीर हे कट्टर इस्लामवादी असून त्यांना भारतासोबत संघर्ष हवा आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
दुसरीकडे, इम्रान खान यांच्या दुसर्या भगिनी उझ्मा खान यांनी रावळपिंडीतील अडियाला तुरुंगात इम्रान खान यांची भेट घेतली आणि सांगितले की, त्यांची प्रकृती ठीक आहे; परंतु मुनीर यांच्याकडून त्यांचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप केला. आलिमा खान यांनी स्काय न्यूजवरील ‘द वर्ल्ड विथ याल्दा हकीम’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले, जिथे त्यांनी मुनीर आणि आपला भाऊ इम्रान खान यांच्यात स्पष्ट फरक दाखवला. आलिमा यांनी दावा केला की, मुनीर यांचा द़ृष्टिकोन इस्लामी कट्टरतावादाने प्रभावित आहे आणि हीच मानसिकता त्यांना भारतासोबत शत्रुत्व ठेवण्यास प्रवृत्त करते.
‘असीम मुनीर हे एक अत्यंत कट्टरतावादी इस्लामी आणि पुराणमतवादी आहेत. याच कारणामुळे त्यांना भारतासोबत युद्धाची इच्छा आहे. त्यांचा इस्लामी कट्टरतावाद आणि पुराणमतवादी विचार त्यांना इस्लाम न मानणार्यांविरुद्ध लढण्यास भाग पाडतात,” असे त्या कार्यक्रमात म्हणाल्या.
इम्रान यांची भारताशी मैत्री
“जेव्हा कधी इम्रान खान सत्तेत येतील, तेव्हा तुम्ही पाहाल की, ते नेहमी भारताशी आणि अगदी भाजपशीही मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. जेव्हा जेव्हा हे कट्टर इस्लामवादी, असीम मुनीर असतील, तेव्हा तुम्ही पाहाल की भारतासोबत युद्ध होईल आणि फक्त भारतच नाही, तर भारताच्या मित्रराष्ट्रांनाही त्रास होईल,” असे त्या म्हणाल्या.