

नवी दिल्ली : अमेरिकेच्या अलास्कामध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ इतकी मोजण्यात आली.
भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ४८ किलोमीटर खोलीवर होता. NCS नुसार, इतक्या कमी खोलीवर आलेल्या भूकंपानंतर पुन्हा धक्के (आफ्टरशॉक) बसण्याची शक्यता जास्त असते. दुसरीकडे, ताजिकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.६ इतकी नोंदवण्यात आली. यापूर्वी १७ जुलै रोजीदेखील अलास्कामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.३ इतकी मोजण्यात आली होती. NCS नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू ३६ किलोमीटर खोलीवर होता.
तज्ज्ञांच्या मते, जास्त खोलीवर येणाऱ्या भूकंपांच्या तुलनेत अलास्कातील ६.२ तीव्रतेचा भूकंप अधिक धोकादायक आहे. त्यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूगर्भविज्ञानाच्या भाषेत, इतक्या कमी खोलीवरील धक्क्यांना सामान्यतः 'उथळ भूकंप' (shallow earthquake) मानले जाते. ते अधिक धोकादायक असण्याचे कारण म्हणजे भूकंपाच्या लहरींना पृष्ठभागावर पोहोचण्यासाठी लागणारा कमी वेळ. अशा स्थितीत जमीन जास्त हादरते आणि इमारतींचे मोठे नुकसान होते. परिणामी, जीवितहानी होण्याचा धोका वाढतो.
अलास्काच्या आखातात आलेल्या भूकंपानंतर किनारपट्टीच्या काही भागांमध्ये त्सुनामीचा इशारा दिला आहे. लोकांना उंच ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर, त्यांना समुद्रकिनारे आणि नद्यांसारख्या जलस्त्रोतांपासून दूर राहण्यास सांगितले आहे.
दुसरीकडे, ताजिकिस्तानमध्येही आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार (NCS), भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.६ इतकी मोजण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली २३ किलोमीटर खोलीवर होता.