Al Minister Of Albania :
जगभरात सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात AI वापराबद्दल अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नवे AI चॅटबॉट, त्याच्या आधुनिक आवृत्त्या मार्केटमध्ये येत आहेत. यामुळं अनेक लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येत असल्याची ओरड देखील सुरू आहे. अनेक टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ कमी करण्यास सुरूवात देखील केली आहे. सामान्य लोकांमध्ये नोकरीबाबत चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. रोज कोण ना कोण उठतो आणि AI इतक्या नोकऱ्या खाणार असं भाकीत करतो. या AI मुळं सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असतानाच आता या AI मुळं मंत्र्यांचे देखील धाबे दणाणले आहेत.
अल्बानिया या देशानं जगातील सर्वात पहिला AI मंत्री नियुक्त केला आहे. मंत्री डिएला या एआय मंत्र्याचं काम हे सार्वजनिक खर्चातील भ्रष्टाचार कमी करणं आणि पारदर्शकता आणणं आहे. याबाबतची घोषणा अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी केली. आता इथून पुढं अल्बानियाच्या सर्व सार्वजनिक टेंडर, खासगी कंत्राटं आणि सरकारी उपक्रम याच्यावर डिएलाची बारीक नजर असणार आहे.
अल्बानियन भाषेत डिएलाचा अर्थ हा सूर्य असा होतो. ही डिएला ही एक कॅबिनेट मंत्री असणार आहे. ती वैयक्तिकरित्या नाही मात्र व्हर्च्युअली एआयच्या स्वरूपात उपस्थित असणार आहे. यापूर्वी अल्बानियाच्या सरकारनं जानेवारी २०२५ मध्ये इ अल्बाननिया हा व्हॉईस असिस्टंट प्लॅटफॉर्म लाँच केला होता. पूर्वी डिएला ही नागरिकांना सरकारच्या सेवांबाबत माहिती देण्यासाठी तयार करण्यात आली होती. तेव्हापासून या एआय बॉटनं ३६ हजार डिजीटल डॉक्युमेंट प्रोसेस केले आहेत. त्याद्वारे १ हजार सेवा नागरिकांना पुरवल्या आहेत.
आता याच डिएलाला मंत्री म्हणून बढती मिळाली आहे. डिएला ही जगातील पहिली एआय मिनिस्टर आहे. तिच्याकडे आता सरकारी कंत्राटांसदर्भातील निर्णय घेण्याची घेण्याची जबाबदारी असणार आहे. रामा यांनी सांगितलं की अल्बेनियामधील प्रत्येक सार्वजनिक टेंडर हे डिएलाच्या नजरेखालून जाणार आहे. त्यामुळं ते १०० टक्के भ्रष्टाचार मुक्त असेल. यामुळं निधींच पारदर्शकपणे वाटप होणार आहे. हा निर्णय अल्बेनियामधील वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या समस्येनंतर घेण्यात आला आहे.