

Adnan Sami blasts ex-Pak minister for questioning citizenship
गायक अदनान सामी आणि पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन यांच्यात सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक चकमक झडली आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश दिले. त्यानंतर X वर फवाद हुसेन यांनी "आता आदनान सामीलाही परत पाकिस्तानला पाठवणार का?" असा सवाल केला होता.
या प्रश्नावर अदनान सामी याने फवाद हुसेन यांना "अडाणी मूर्ख" असे संबोधून जोरदार उत्तर दिले आहे. 2016 सालीच भारतीय नागरिकत्व घेतल्याचेही अदनान सामीने म्हटले आहे.
जम्मू-काश्मिरमध्ये पहलगाममधील हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली आणि विविध राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना 27 एप्रिलपूर्वी देश सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच वैद्यकीय व्हिसावर भारतात आलेल्यांना 29 एप्रिलपर्यंत भारतातून जाण्यास सांगितले आहे.
चौधरी फवाद हुसैन हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारमध्ये माहिती व विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री होते. भारताच्या या कृतीनंतर फवाद यांनी ट्विट केले की, आता अदनान सामीचं काय?
"अदनान सामीचं काय?" असा सवाल फवाद हुसेन यांनी उपस्थित केला. त्यावर अदनान सामी यांनी त्वरीत प्रत्युत्तर देत ट्विटरवर लिहिलं, ""या अडाणी मूर्खाला कोण सांगणार?""
त्यानंतर फवाद यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, आमच्या लाहोरचा असलेला अदनान सामी असं वाटतंय जसं फुग्यातून हवा निघून गेली आहे. गेट वेल सून...
त्यावर अदनान याने रिप्लाय दिला की, या मुर्खाला एवढंही माहिती नाही की मी मूळचा लाहोरचा नसून पेशावरचा आहे. तुम्ही इन्फर्मेशन मिनिस्टर होतात की मिसइन्फर्मेशन मिनिस्टर?
आणि तुम्हाला कशाबाबतही कसलीही इन्फर्मेशन नाही. तुमच्याकडे चुकीची इन्फर्मेशन आहे. आणि तुम्ही विज्ञान मंत्रीसुद्धा होता? ते बुलशिट विज्ञान होते का?" असा जळजळीत सवालही अदनान सामीने केला आहे.
अदनान सामी यांनी 2016 मध्ये भारतीय नागरिकत्व मिळवले आणि ते सध्या मुंबईत कुटुंबासह वास्तव्यास आहेत.
पूर्वीच्या मुलाखतींमध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी 18 वर्षे लागली आणि त्यात दीड वर्षं ते कोणत्याही देशाचे नागरिक नव्हते. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सामी यांनी हेही सांगितलं होतं की, "पाकिस्तानमध्ये मला धोका वाटत होता."