Afghanistan bus accident
काबूल: पश्चिम अफगाणिस्तानात इराणमधून निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या एका बसची ट्रक आणि मोटरसायकलशी धडक होऊन आग लागल्याने १७ मुलांसह ७१ हून अधिक जणांचा होरपळून मृत्यू झाला. प्रांतीय सरकारचे प्रवक्ते अहमदुल्ला मुत्तकी आणि स्थानिक पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
बसचा अतिवेग आणि चालकाचा निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रांतीय अधिकारी मोहम्मद युसूफ सईदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काबूलच्या दिशेने जाणारी ही बस नुकत्याच इराणमधून हद्दपार करण्यात आलेल्या अफगाण निर्वासितांना घेऊन जात होती. हे सर्व प्रवासी इराणमधून हद्दपार करण्यात आलेल्या अफगाण नागरिकांच्या मोठ्या समूहाचा एक भाग होते. यापूर्वी, इराणचे गृहमंत्री इस्कंदर मोमेनी यांनी मार्च महिन्यापर्यंत सुमारे ८ लाख लोकांना देशाबाहेर काढण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.
सईदी यांनी सांगितले की, सर्व प्रवासी इस्लाम कला या सीमावर्ती ठिकाणी बसमध्ये चढले होते. बसने प्रथम मोटरसायकलला धडक दिली आणि त्यानंतर इंधनवाहू ट्रकला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, बसने तात्काळ पेट घेतला. यात ७१ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. केवळ तीन प्रवासी सुदैवाने बचावले आहेत. मृतांमध्ये ट्रकमधील दोन आणि मोटरसायकलवरील दोन व्यक्तींचाही समावेश आहे.