

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडाच्या (Canada) ब्रॅम्प्टनमधील (Brampton) हिंदू सभा मंदिरावर खलिस्तानी समर्थकांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कॅनडातील हिंदू समुदायाने एकता रॅली काढली. ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या खलिस्तानी हल्ल्यानंतर हिंदू सभा मंदिर आणि समुदायाची एकता दर्शवण्यासाठी ४ नोव्हेंबरच्या रात्री ब्रॅम्प्टन येथील हिंदू सभा मंदिराबाहेर मोठी गर्दी झाली होती. कोएलिशन ऑफ हिंदू इन नॉर्थ अमेरिका (CoHNA) च्या बॅनरखाली हे हिंदू बांधव एकत्र आले होते. यावेळी हिंदू समुदायाने खलिस्तानी समर्थकांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. या ठिकाणी खलिस्तानींच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. तर जय श्रीरामचा जयघोष करण्यात आल्या.
कॅनडातील राजकीय नेते आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनी खलिस्तानींना आणखी पाठिंबा देऊ नये, असा संदेश या एकता रॅलीने दिला आहे. "सुमारे एक हजार कॅनेडियन हिंदू ब्रॅम्प्टनमध्ये हिंदू मंदिरांवरील वाढत्या हल्ल्यांचा निषेध नोंदवण्यासाठी एकत्र आले. पवित्र दिवाळी सणाच्या विकेंडला कॅनडातील हिंदू मंदिरांवर हल्ले झाले. कॅनडाने आता हिंदूफोबिया थांबवावा," असे CoHNA Canada ने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
यावेळी निदर्शकांनी 'जय श्री राम'चा जयघोष केला. त्यांनी खलिस्तानविरोधी घोषणाही दिल्या. त्यांच्या हातात कॅनडा आणि भारताचा ध्वज होता. कॅनडातील हिंदूंशी २० वर्षांपासून सातत्याने भेदभाव केला जात आहे. कॅनडाने हिंदूंना योग्य वागणूक द्यावी, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अशा कारवाया भारताचा संकल्प कमकुवत करू शकत नाहीत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. दोन देशांमधील राजकीय तणाव वाढत असताना कॅनडातील एका हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे.
कॅनडातील एका हिंदू मंदिरात भाविकांना मारहाण करण्यात आली. काही लोक खलिस्तानी झेंडे घेऊन मंदिराच्या आवारात घुसले आणि त्यांनी भाविकांना मारहाण केली. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिंदूंवरील या हल्ल्यानंतर जोरदार टीका होत आहे.