सर्वाधिक भ्रष्टांच्या यादीत घनी, असद, अर्दोगान | पुढारी

सर्वाधिक भ्रष्टांच्या यादीत घनी, असद, अर्दोगान

वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : ‘ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’ (ओसीसीआरपी) या माध्यम क्षेत्रातील संस्थेने भ्रष्ट शिरोमणींची एक जागतिक यादी तयार केली आहे. संस्थेने अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांचा जगातील सर्वाधिक भ्रष्ट नेत्यांच्या यादीत समावेश केला आहे. यादीनुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे मित्र तसेच बेलारूसचे अध्यक्ष अ‍ॅलेक्झांडर लुकाशेंको हे ‘करप्ट पर्सन ऑफ द इयर’ ठरले आहेत.

सीरियाचे हुकूमशहा बशर अल-असद, तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप अर्दोगान आणि ऑस्ट्रियाचे चान्सलर सेबॅस्टियन कुर्झ यांचा भ्रष्ट म्हणून या यादीत समावेश करण्यात आला आहे.

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा जमविण्यापूर्वीच घनी यांनी आपल्या नागरिकांना संकटात सोडून जमेल तो पैसाअडका सोबत घेऊन देशातून पळ काढला होता. घनी आर्थिक तसेच नैतिक दोन्ही द‍ृष्टीने भ्रष्ट ठरले आहेत, असे संस्थेचे सह-संस्थापक सुलिव्हन यांनी सांगितले. सहा पत्रकार आणि अभ्यासकांच्या एका पॅनेलने मिळून ही यादी तयार केली.

‘अरब रिपोर्टर्स फॉर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम’चे महासंचालक विल फिट्झगिब्बन, ‘इंटरनॅशनल कॉन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टस्’चे बोयांग लिम, पुलित्झर सेंटरचे वरिष्ठ संपादक लुईस शेली, जॉर्ज मेसन, लेखक आणि प्राध्यापक पॉल राडू, सुलिव्हन आदींचा या पॅनेलमध्ये समावेश होता.

असे नेते; असे आरोप

लुकाशेंको : लुकाशेंको (67) 1993 पासून बेलारूसमध्ये सत्तेवर आहेत. निवडणुकीत हेराफेरी, टीकाकारांचा छळ आदींत ते लिप्‍त आहेत.

असद : असद यांनी सीरियाला गृहयुद्धात लोटले आणि सत्तेत असताना कोट्यवधी डॉलरची लूट केली.

अर्दोगान : अर्दोगान यांनी सरकारी बँकांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर मनी लाँड्रिंग केली आहे.

कुर्झ : (ऑस्ट्रियन पीपल्स पक्षाचे नेते) यांच्यावर वृत्तपत्र घोटाळा आणि लाचखोरीचे अनेक आरोप आहेत.

Back to top button