Human Trafficking Case | आंतरराष्ट्रीय मानवी तस्कर प्रकरणात नाशिकचा युवक गजाआड  | पुढारी

Human Trafficking Case | आंतरराष्ट्रीय मानवी तस्कर प्रकरणात नाशिकचा युवक गजाआड 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नोकरी मिळवून देण्याचे आमीष दाखवून देशातील तरुणांना परदेशात पाठवून त्यांना तेथे डांबून ठेवत सायबर फसवणूकीत गुंतवल्याच्या प्रकरणाचा छडा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) लावला आहे. याप्रकरणात एनआयएने नाशिकमधून एका संशयित तरुणास पकडले आहे. सुदर्शन दराडे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणात तपास यंत्रणांनी एकूण सहा संशयितांना अटक केली आहे.

एनआयएने काढलेल्या प्रसिद्ध पत्रकानुसार, दराडे हा संघटित तस्करी सिंडिकेटमध्ये थेट सहभागी होता. भारतीय तरुणांना परदेशात नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देऊन परदेशात नेण्यासाठी त्याचा सहभाग होता. भारतीय तरुणांना लाओस, गोल्डन ट्रँगल एसईझेड आणि कंबोडिया येथे बनावट कॉल सेंटर्समध्ये काम करण्यास भाग पाडले जात होते. तसेच इतर ठिकाणी परदेशी संशयितांमार्फत हे सिंडीकेट चालवले जात असल्याचे समोर आले आहे. यात भारतासह कंबोडिया, लाओस एसईझेड, यूएई आणि व्हिएतनाम सारख्या इतर देशांतील संशयितांसोबत संबंध आढळून आले. आतापर्यंत अटक केलेले संशयित हे थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाममधील भारतीय तरुणांना लाओस एसईझेडमध्ये बेकायदेशीरपणे नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून कार्यरत असलेल्या तस्करांशी संगनमताने काम करत असल्याचा दावा एनआयएने केला आहे. तस्करी झालेल्या तरुणांना ऑनलाइन बेकायदेशीर कृत्ये करण्यास भाग पाडले गेले. ज्यात क्रेडिट कार्ड फसवणूक, बनावट अर्ज वापरून क्रिप्टो चलनात गुंतवणूक करण्यास भाग पाडणे, हनी ट्रॅप इत्यादी प्रकरणांमध्ये नागरिकांना बळी पाडून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात होती. एनआयएच्या तपासांनुसार, २७ मे पासून भारतातील विविध राज्यांमधून पाच संशयितांना अटक केली आहे. त्यानंतर नाशिकमधून सहाव्या संशयितास शुक्रवारी (दि.१४) पकडले आहे.

तस्कर- सायबर घोटाळेबाज यांच्यात संबंध

एनआयएच्या पथकाने कागदपत्रे, डिजिटल उपकरणे, बँक खात्यांचे तपशील इत्यादींसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. ज्याची तपासणी करून मानवी तस्करी आणि तरुणांकडून सायबर फसवणूक करवून घेतल्याचे प्रकरणे उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंतरराष्ट्रीय सिंडिकेटच्या आदेशानुसार कार्यरत, तस्कर आणि सायबर घोटाळेबाज यांच्यात देशभरात संबंध असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याने १३ मे रोजी मुंबई पोलिसांकडून एनआयएने तपास हाती घेतला आहे.

हेही वाचा –

Back to top button