जपानी नौदलाचे दोन हेलिकॉप्टर प्रशांत महासागरात कोसळले, एकाचा मृत्यू | पुढारी

जपानी नौदलाचे दोन हेलिकॉप्टर प्रशांत महासागरात कोसळले, एकाचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : टोकियोच्या दक्षिणेला पॅसिफिक महासागरात रात्रीच्या प्रशिक्षणादरम्यान आठ क्रू सदस्यांना घेऊन जाणारी दोन जपानी नौदलाची हेलिकॉप्टर कोसळली. यात एकाचा मृत्यू झाला असून सात जण बेपत्ता असल्याचे जपानच्या संरक्षण मंत्र्यांनी रविवारी सांगितले.

शनिवारी रात्री प्रशिक्षणादरम्यान दोन्ही हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये आठ क्रू मेंबर्स होते. संरक्षण मंत्री मिनोरू किहारा यांनी सांगितले की, सागरी सेल्फ-डिफेन्स फोर्स (एमएसडीएफ) चे दोन SH-60K हेलिकॉप्टर, प्रत्येकी चार क्रू सदस्यांना घेऊन गेले, त्यांचा शनिवारी उशिरा टोकियोच्या दक्षिणेस ६०० किलोमीटर अंतरावर टोरिशिमा बेटावर संपर्क तुटला.

या अपघाताचे कारण अद्याप समजले नसले तरी दोन्ही हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळून पाण्यात पडले असावेत. बचावकर्त्यांनी फ्लाइट डेटा रेकॉर्डर, प्रत्येक हेलिकॉप्टरमधून एक ब्लेड आणि त्याच भागात दोन्ही हेलिकॉप्टरमधील तुकडे जप्त केले, यावरून दोन Sh-60K एकमेकांच्या जवळ जवळ उडत होते. अपघात कशामुळे झाला हे निर्धारित करण्यासाठी अधिकारी फ्लाइट डेटाचे विश्लेषण करतील, असे त्यांनी सांगितले.

बेपत्ता क्रू मेंबर्सचा शोध आणि सुटका करण्यासाठी एमएसडीएफने आठ युद्धनौका आणि पाच विमाने तैनात केली आहेत. सिकोर्स्कीने विकसित केलेल्या आणि सीहॉक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या हेलिकॉप्टरमध्ये दुहेरी इंजिन होते. हे सुधारित आणि ‘मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज’ ने तयार केले होते. ते रात्री पाण्यात पाणबुडीविरोधी प्रशिक्षण घेत होते, असे किहारा यांनी सांगितले. हेलिकॉप्टरमधून फक्त एकच आपत्कालीन कॉल आल्याचेही ते म्हणाले.

Back to top button