Lok Sabha election 2024 | लोकसभा निवडणुकीमध्ये चीन AI द्वारे करू शकतो फेरफार, Microsoft रिपोर्टमधून दावा

Lok Sabha election 2024 | लोकसभा निवडणुकीमध्ये चीन AI द्वारे करू शकतो फेरफार, Microsoft रिपोर्टमधून दावा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : तैवानच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील चाचणीनंतर चीन आता कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) तयार केलेल्या कंटेंटचा वापर भारतातील लोकसभा निवडणुकांदरम्यान फेरफार करण्यासाठी करू शकतो, असा धोक्याचा इशारा मायक्रोसॉफ्टने (Microsoft report) दिला आहे. चीन सरकारचा सायबर ग्रुप उत्तर कोरियाच्या पाठिंब्याच्या जोरावर अमेरिका आणि दक्षिण कोरियामधील निवडणुकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करु शकतो, असे मायक्रोसॉफ्ट थ्रेट इंटेलिजन्सच्या विश्लेषणातून दिसून आले आहे. (Lok Sabha election 2024 )

"चीन त्याच्या हितसंबंधांसाठी AI-जनरेटेड कंटेंट तयार करेल आणि त्याचा गैरवापर करु शकतो. निवडणूक निकालांवर अशा कंटेंटचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. पण मीम्स, व्हिडिओज आणि ऑडिओ कंटेंट वाढवण्याचा चीनचा प्रयोग सुरुच राहील आणि तो अधिक प्रभावी ठरू शकतो." असेही अहवालात म्हटले आहे.

देशातील लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत होणार आहे. ही निवडणूक १९ एप्रिलपासून सुरू होणार असून ती १ जूनपर्यंत चालणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.

चिनी सायबर ग्रुप फ्लॅक्स टायफून हा वारंवार दूरसंचार क्षेत्रावर हल्ला करतो. त्याने २०२३ च्या सुरुवातीला आणि हिवाळ्यात भारत, फिलीपिन्स, हाँगकाँग आणि अमेरिकेला टार्गेट केले होते. फेब्रुवारीमध्ये एका चिनी हॅकर ग्रुपने PMO (पंतप्रधान कार्यालय) आणि गृह मंत्रालय आणि रिलायन्स आणि एअर इंडिया सारख्या व्यवसायांसह भारत सरकारच्या प्रमुख कार्यालयांना टार्गेट केल्याचा दावा केला होता.

द वॉशिंग्टन पोस्टने केलेल्या तपासात हे उघड झाले आहे की हॅकर्सनी भारत सरकारच्या ९५.२ गीगाबाइट्स इमिग्रेशन डेटामध्ये घुसखोरी केली होती. या दरम्यान लीक झालेल्या फाईल्स GitHub वर पोस्ट करण्यात आल्या होत्या.

Storm-1376 ग्रुप

मायक्रोसॉफ्टच्या अहवालात असेही म्हटले आहे की Storm-1376 हा आणखी एक चिनी कम्युनिस्ट पार्टी (CCP) शी संबंधित ग्रुप असून त्याने म्यानमारमधील अशांततेला अमेरिका आणि भारत जबाबदार असल्याचा आरोप करत मँडरीन (चायनीज) आणि इंग्रजीमध्ये एआय-जनरेटेड अँकरचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

फेब्रुवारी २०२१ मध्ये लष्कराने केलेल्या बंडानंतर म्यानमारला गृहयुद्धाच्या संघर्षाचा सामना करावा लागत आहे. या सत्तापालटामुळे २०२१ मध्ये प्रचंड मोर्चे निघाले होते. जे क्रूरपणे दडपण्यात आले होते. आँग सान स्यू की यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले.

डीपफेकचा धोका

गेल्या महिन्यात मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि विविध AI टूल्सद्वारे तयार होणाऱ्या डीपफेक कंटेंटच्या धोक्याबद्दल चर्चा झाली होती. "भारतासारख्या मोठ्या देशात डीपफेकद्वारे दिशाभूल होण्याची शक्यता नेहमीच असते. जर कोणी माझ्याबाबतीत असे केले तर सुरुवातीला लोक त्यावर विश्वास ठेवतील," असे पीएम मोदी म्हणाले होते.

AI कंटेंटचा गैरवापर

चीनने जानेवारीत तैवानच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत AI कंटेंटचा गैरवापर केला होता. त्यांनी AI चा वापर करून चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला होता, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की AI -जनरेटेड टीव्ही न्यूज अँकरचा वापर होत आहे. एका उदाहरणाचा दाखला देत अहवालात नमूद केले आहे की, निवडणूक उमेदवार टेरी गौ यांचा युट्यूबवर एक बनावट व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. टेरी गौ यांनी मतदानापूर्वी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्या दुसऱ्या उमेदवाराच्या समर्थन करताना दिसल्या होत्या.

मतदारांमध्ये फूट पाडणाचा प्रयत्न

या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेतही निवडणुका होणार आहेत. चिनी ग्रुप मतदारांमध्ये फूट पाडणारे प्रश्न विचारण्यासाठी आणि मुख्य मतदानाची आकडेवारीची गुप्त माहिती गोळा करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत, असे मायक्रोसॉफ्टच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

फ्लॅक्स टायफून ग्रुप आहे तरी काय?

मायक्रोसॉफ्टने चीनमधील फ्लॅक्स टायफून ग्रुप नेमके काय करत आहे? याची माहिती दिली आहे. हा ग्रुप हेरगिरी करण्याच्या उद्देशाने तैवानमधील डझनभर संस्थांना टार्गेट करत आहे. फ्लॅक्स टायफून तैवानी संस्थांच्या नेटवर्कमध्ये मालवेअरचा कमीत कमी वापर करून दीर्घकाळासाठी घुसखोरी करतो. या ब्लॉगचा उद्देश या ग्रुपने वापरलेल्या तंत्रांबद्दल जागरूकता वाढवणे आणि भविष्यातील हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी अधिक चांगल्या संरक्षणाची माहिती देणे हा आहे.

फ्लॅक्स टायफून २०२१ च्या मध्यापासून सक्रिय आहे. त्याने तैवानमधील सरकारी संस्था आणि शिक्षण, उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञान संस्थांना टार्गेट केले आहे. फ्लॅक्स टायफूनच्या हल्ल्याला दक्षिणपूर्व आशिया, तसेच उत्तर अमेरिका आणि आफ्रिकेतील काही यंत्रणा बळी पडल्या आहेत. फ्लॅक्स टायफून सराईतपणे क्रेडेन्शियल अॅक्सेसवर लक्ष केंद्रित करतो. फ्लॅक्स टायफून चायना चॉपर वेब शेल, मेटास्प्लॉइट, ज्युसी पोटॅटो प्रिव्हिलेज एस्केलेशन टूल, मिमिकॅट्झ आणि सॉफ्टइथर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) क्लायंट वापरण्यासाठी ओळखला जातो. फ्लॅक्स टायफून प्रामुख्याने लिव्हिंग-ऑफ-द-लँड तंत्र आणि हँड-ऑन-कीबोर्ड हालचालीवर अवलंबून आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news