इराण ची इस्रायलला खुली धमकी; आधी तुमची क्षमता तपासा | पुढारी

इराण ची इस्रायलला खुली धमकी; आधी तुमची क्षमता तपासा

तेहरान ; वृत्तसंस्था : इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर इराणच्या अणुऊर्जा केंद्रांचे प्रमुख महम्मद इस्लामी यांनी आपल्या आण्विक केंद्रांवर हल्ला करण्यावरून इस्रायलला खुली धमकी दिली आहे. इस्रायलने पहिल्यांदा आत्मचिंतन करावे. धमकी देण्यापूर्वी आपली क्षमता तपासावी, असे इस्लामी म्हणाले.

यापूर्वी इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली शामखानी यांनी इस्रायलला धमकी देत म्हटले होते की, इस्रायलने इस्लामिक गणराज्यावर हल्ला करण्याची हिंमत केल्यास त्यांना मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल.

दरम्यान, इस्रायलने इराणच्या आण्विक केंद्रांवर हल्ला करण्यासाठी 1.5 बिलियन डॉलर्सच्या फंडिंगला मंजुरी दिली आहे. लढाऊ विमाने आणि गुप्‍त माहिती मिळण्यासह संरक्षण साहित्याच्या निर्मितीसाठी या फंडाचा वापर केला जाणार आहे. इराणवरून आण्विक प्रतिबंध हटविण्याच्या शंकेने आम्ही चिंतीत आहोत. याबाबत अमेरिकेसह अन्य देशांशी चर्चा करत असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यापूर्वी सांगितले होते.

इराण बरोबर आण्विक चर्चा करण्यासाठी पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्‍नामध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. ‘जाईंट काम्प्रेहेन्सिव्ह फ्लॅन ऑफ अ‍ॅक्शन’ नावाच्या समूहामध्ये चीन, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनचा समावेश आहे. अमेरिकाही या बैठकीला आपला प्रतिनिधी निरीक्षक म्हणून पाठवणार आहे.

Back to top button