

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील बाल्टिमोर शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील फ्रान्सिस स्कॉट पूल मालवाहू जहाजाची धडक बसल्याने कोसळला. बाल्टिमोर सिटी फायर डिपार्टमेंटचे कम्युनिकेशन डायरेक्टर चीफ केविन कार्टराईट यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. पुलाला मोठ्या मालवाहू जहाजाने धडक दिली, ज्यामुळे तो पॅटापस्को नदीत कोसळला. या दुर्घटनेत २० हून अधिक लोक आणि अनेक वाहने नदीत कोसळली असल्याची प्राथमिक माहिती बाल्टिमोर शहर अग्निशमन विभागाने दिली आहे. ही घटना सकाळी १.३० वाजता (अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार) घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
बाल्टिमोर अग्निशमन विभागाचे केविन कार्टराईट यांनी 'सीएनएन'शी बोलताना सांगितले की, "सुमारे २० पर्यंत लोक पॅटापस्को नदीत तसेच अनेक वाहने असू शकतात." दरम्यान, फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज कोसळल्यानंतर गव्हर्नर वेस मूर यांनी मेरीलँडमध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे.
दरम्यान, बचावकार्यादरम्यान अधिकाऱ्यांनी आज सकाळी दोन लोकांना पाण्यातून वाचवले. एकाला कसलीही दुखापत झालेली नाही. पण दुसऱ्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आले आहे, अशी माहिती बाल्टिमोर अग्निशमन विभागाने दिली आहे.
सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले असून त्यात हा पूल पत्त्याप्रमाणे कोसळताना दिसत आहे. (Baltimore Bridge collapse) बाल्टिमोर शहर अग्निशमन विभागाने, बाल्टिमोर पूल कोसळणे ही मोठी दुर्घटना असल्याचे म्हटले आहे. यात नेमकी किती जीवितहानी झाली आहे याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
बीबीसीच्या वृत्तानुसार, मेरीलँड वाहतूक प्राधिकरणाने पुष्टी केली आहे की अमेरिकेतील बाल्टिमोर शहरातील फ्रान्सिस स्कॉट पुलावरील घटनेमुळे दोन्ही दिशांनी सर्व वाहूतक बंद करण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी १:३० वाजता (०५:३० GMT) ९११ कॉलवरून फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज परिसरातील दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानंतर बचावपथकांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुमारे अडीच किमी लांब, चार पदरी असलेला हा पूल पटापस्को नदीवर आहे. बाल्टिमोर बंदराचा सर्वात बाहेरील क्रॉसिंग आणि आंतरराज्य ६९५ किंवा बाल्टिमोर बेल्टवेचा एक आवश्यक दुवा म्हणून तो काम करतो. (Baltimore Bridge collapse)
शिप ट्रॅकिंग डेटानुसार, अमेरिकेच्या बाल्टिमोरमधील की ब्रिजला धडक दिलेल्या जहाजावर सिंगापूरचा ध्वज आहे. हे जहाज ३०० मीटर लांब असून ते श्रीलंकेतील कोलंबोला जात होते. सागरी रडारवरील माहितीनुसार, Dali जहाज पोर्ट ब्रीझ येथील टर्मिनलवरून मध्यरात्री स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री १२.४५ वाजता (४:४५ am GMT) च्या सुमारास निघाले होते. ते फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजच्या दिशेने गेले. पण ४५ मिनिटांनंतर ते पुलाच्या ठिकाणी स्थिर झाले.
हवाई वाहतूक रडारवरून असे दिसून आले आहे की पोलिसांची हेलिकॉप्टर या परिसरात फिरत आहेत.
१९७७ मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या पुलाचे नाव "द स्टार-स्पँगल्ड बॅनर"च्या लेखकाच्या नावावरून ठेवण्यात आले होते, असे एटीएने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे. फ्रान्सिस स्कॉट की १८१४ मध्ये फोर्ट मॅकहेन्रीवर झालेला बॉम्बस्फोट पाहिल्यानंतर पुलाजवळ बसला होता. असे मानले जाते की ज्यामुळे त्याला अमेरिकेचे राष्ट्रगीत लिहिण्याची प्रेरणा मिळाली. बाल्टिमोर पोर्टने गेल्या वर्षी सुमारे ८० अब्ज डॉलर किमतीच्या ५२ दशलक्ष टनांहून अधिक आंतरराष्ट्रीय मालवाहतूक केली. मेरीलँड सरकारच्या वेबसाइटनुसार, अमेरिकेतील बंदरांमध्ये बाल्टिमोर पोर्ट एकूण नवव्या क्रमांकावर आहे.
हे ही वाचा :