Gaza Ceasefire : ‘गाझामध्ये युद्धविराम करा’, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ठराव मंजूर | पुढारी

Gaza Ceasefire : ‘गाझामध्ये युद्धविराम करा’, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ठराव मंजूर

पुढारी ऑनलाईन डेस्क : Gaza Ceasefire : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सोमवारी गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला. मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्याचे कारण देत सुरक्षा परिषदेने युद्ध त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे. यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी याबाबत एक्स पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

अँटोनियो गुटेरेस यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, परिषदेने गाझामधील युद्ध थांबविण्याचे तसेच इस्रायलवर 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर हमासने ओलीस ठेवलेल्या लोकांची बिनशर्त सुटका करण्याच्या मागणीचा ठराव मंजूर केला. त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हायला हवी.’

अल्जेरिया, गयाना, इक्वाडोर, जपान, माल्टा, मोझांबिक, सिएरा लिओन, स्लोव्हेनिया, दक्षिण कोरिया आणि स्वित्झर्लंडसह आंतरराष्ट्रीय मंचाच्या 12 स्थायी सदस्य नसलेल्या देशांनी हा ठराव मांडला होता. या ठरावाबाबत युनायटेड नेशन्समधील मोझांबिकचे राजदूत पेड्रो कोमिसारियो अफोंसो म्हणाले की, ‘आम्ही या ठरावाबद्दल आणि गाझामधील आपत्तीजनक परिस्थिती संपवण्यासाठी या परिषदेच्या सर्व सदस्यांच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. गाझामधील परिस्थिती संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासाठी गंभीर चिंतेची बाब आहे. गाझा पट्टीतील विनाशकारी परिणाम आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी स्पष्ट धोका आहेत.

Back to top button