अफगाणिस्तान : आत्मघातकी हल्ल्याने कंदहार हादरले, 21 जणांचा मृत्यू | पुढारी

अफगाणिस्तान : आत्मघातकी हल्ल्याने कंदहार हादरले, 21 जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kandahar Bomb Attack : अफगाणिस्तानमधील कंदहार शहर पुन्हा एकदा बॉम्ब स्फोटाने हादरले. गुरुवारी एका व्यक्तीने एका खासगी बँकेत स्वत:ला बॉम्बने उडवून दिले. या आत्मघातकी हल्ल्यात 21 नागरिका मृत्यूमुखी पडले असून अनेक जण जखमी झाले आहेत. सरकारी कर्मचारी पगार घेण्यासाठी रांगेत उभे असताना हा स्फोट झाला.

गुरुवारी सकाळी 8.30 वाजता कंदाहारमधील काबुल बँकेच्या शाखेजवळ झालेल्या या स्फोटाचा उद्देश तालिबानी लष्कराचे जवानांना लक्ष्य करण्याचा होता, असे एका अहवालात स्पष्ट झाले आहे. या स्फोटात किमान आठ तालिबानी जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेची जबाबदारी कोणत्याही गटाने घेतलेली नाही. हा परिसर सील करण्यात आला असून सर्वसामान्यांची ये-जा बंद करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तपास पूर्ण होईपर्यंत परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

तालिबान सरकारच्या माहितीनुसार, सरकारी कर्मचारी पगार घेण्यासाठी कंदहार शहरातील काबुल बँकेच्या शाखेत आले होते. यावेळी कर्मचा-यांची मोठी रांग होती. त्याचवेळी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने अचानक स्वत:ला स्फोटकांनी उडवून दिले. यावेळी काही नागरीकांना जागीच आपले प्राण गमवावे लागले. तर अनेकांचा रुग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाला. इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. पण मृतांची संख्या वाढू शकते. कोणत्याही दहशतवादी गटाने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही,’ असे सांगितले.

Back to top button