अक्साई चीन मध्ये बनताहेत पक्के रस्ते | पुढारी

अक्साई चीन मध्ये बनताहेत पक्के रस्ते

बीजिंग/ल्हासा ; वृत्तसंस्था : चिनी सैन्याने पूर्व लडाख क्षेत्रालगत असलेल्या अक्साई चीन भागात नव्या महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. अक्साई चीन भागातील या महामार्गाला लागून जोड रस्तेबांधणीची पूर्वतयारीही चीनकडून सुरू आहे. महामार्ग तसेच या रस्त्यांमुळे चिनी बाजूने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत पोहोचण्याचा वेळ पूर्वीपेक्षा खूपच कमी होणार आहे.

तिबेटच्या ल्हासातून चीनला याआधी सकारात्मक प्रतिसाद फारसा नव्हता; पण नव्या तिबेटी पिढीतील एका मोठ्या घटकाचे ‘ब्रेन वॉशिंग’ करण्यात चिनी कम्युनिस्ट पक्ष यशस्वी झालेला दिसतो. चीनमधील बहुसंख्य तसेच एतद्देशीय अशी ओळख असलेल्या ‘हान’ समुदायातील सैनिकांसह आता भारतीय सीमेलगत तिबेटी सैनिकांची मोठी तैनाती चीनच्या बाजूने झालेली आहे. सीमेलगतच्या भागांतून अनेक नव्या चौक्या चीनने सुरू केल्या आहेत. ही प्रक्रिया सुरूच आहे. तिबेट या स्वतंत्र देशावर चीनने अनधिकृत कब्जा जमविलेला आहे.

भारत आणि चीन यांच्यात सीमेवर सुरू असलेल्या लष्करी तणावादरम्यान, चीनची ही नवी चाल महत्त्वपूर्ण आहे. भारतीय लष्कर चीनच्या या सर्व तयारीवर लक्ष ठेवून आहे. चीनने पूर्व लडाखजवळ क्षेपणास्त्रे आणि रॉकेट रेजिमेंटच्या तैनातीलाही सुरुवात केली आहे. पाळत ठेवणारे ड्रोनही मोठ्या संख्येने चीनकडून सज्ज आहेत. ‘इंडिया टुडे’ने तसे वृत्त दिले आहे.

सामरिक तज्ज्ञांच्या मते, चीनने भारतीय सीमेलगत लष्करी पायाभूत सुविधांच्या उभारणीत अलीकडच्या काळात मोठी आघाडी घेतली आहे. काशगर, गर गुंसा आणि होटन येथे आधीपासूनच चीनचे मुख्य तळ होते; पण आता त्याव्यतिरिक्‍त महामार्ग उभारणी, जोड रस्तेबांधणी, रस्त्यांचे रुंदीकरण आणि नवीन हवाईपट्ट्यांची निर्मिती चीनकडून केली जात आहे.

भारतीय सीमेलगत तैनात चिनी सैनिकांसाठी गतवर्षातील हिवाळा अडचणीचा ठरला होता. निवारा, रस्ते तसेच अन्य अनुकूल परिस्थितीच्या निर्मितीमुळे यंदाचा हिवाळा चिनी सैनिकांसाठी सुकर ठरत आहे. भारत आणि चीन यांच्यात नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान, भारताने सीमेवर चीनच्या लष्करी उभारणीबद्दल चिंता व्यक्‍त केली होती. भारताची चिंता चिनी बाजूकडून ही तर नियमित बाब असल्याचे सांगून उडवून लावण्यात आली होती.

तिबेटी तैनातीमागे ही कारणे…

तिबेटी लोकांना भारतीय सीमेलगतच्या भागात असलेल्या वातावरणाची सवय आहे आणि तिबेटपासून इथपर्यंतची पोहोचही तुलनेत सोपी आहे.

चीनमधून सैन्य आणून इथे तैनात करण्यापेक्षा तिबेटी भूमिपुत्रांचा भारताविरुद्ध उपयोग करून घेण्याचा चिनी मनसुबा आहे. कारण, चिनी सैनिकांना इथले वातावरण मानवत नाही.

* ‘एलएसी’वर पोहोचण्यासाठीचा वेळ वाचणार
* तिबेटी सैनिक मोठ्या प्रमाणावर तैनात
* पूर्व लडाखजवळ क्षेपणास्त्रे आणि रॉकेट तैनात

Back to top button