ब्रेकिंग : पाकिस्‍तानमध्‍ये पुन्‍हा ‘शरीफ’राज, पंतप्रधानपदी Shehbaz Sharif यांची निवड | पुढारी

ब्रेकिंग : पाकिस्‍तानमध्‍ये पुन्‍हा 'शरीफ'राज, पंतप्रधानपदी Shehbaz Sharif यांची निवड

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तान पंतप्रधानपदासाठी झालेल्‍या निवडणुकीत शेहबाज शरीफ यांनी आज (दि.३ मार्च) बाजी मारली. संसदेत मतदानावेळी गदाराेळ झाला. शरीफ यांना २०१ मते मिळाली तर त्‍याचे प्रतिस्‍पर्धी इम्रान खान यांच्‍या ‘पीटीआय’ पक्षाचे ओमर अयुब खान यांना ९२ मतांवर समाधान मानावे लागले. शेहबाज शरीफ सलग दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे स्‍वीकारणार आहेत, असे वृत्त ‘राॅयटर्स’ने दिले आहे. ( Shehbaz Sharif become Pakistan’s Prime Minister )

शेहबाज शरीफ सलग दुसर्‍यांदा पंतप्रधानपदी विराजमान हाेणार

पाकिस्‍तानमध्‍ये ८ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. मात्रकोणत्‍याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. अखेर प्रदीर्घ चर्चेनंतर सर्वाधिक जागा मिळवल्या पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीने युती सरकार स्थापन करण्यावर सहमती दर्शवली. शाहबाज शरीफ यांनी शनिवारी ( दि. २ मार्च)पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता. आज ( दि. ३ मार्च ) पंतप्रधानपदासाठी संसद सदस्‍यांनी मतदान केले. ‘पीटीआय’च्‍या वतीने  उमर अयुब खान यांनी पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता. सभापती अयाज सादिक यांनी शहबाज शरीफ आणि ओमर अयुब खान पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्‍याचे स्‍पष्‍ट करत सदस्‍यांना मतदान करण्याचे निर्देश दिले. मतदानावेळी सुन्नी इत्तेहाद कौन्सिल (SIC) च्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. अखेर गदारोळातच मतदान झाले. शेहबाज शरीफ यांना २०१ मते मिळाली. तर त्‍याचे प्रतिस्‍पर्धी इम्रान खान यांच्‍या ‘पीटीआय’ पक्षाचे ओमर अयुब खान यांना ९२ मतांवर समाधान मानावे लागले. ( Shehbaz Sharif become Pakistan’s Prime Minister )

शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे २४ वे पंतप्रधान असतील. ते ७२ वर्षांचे आहेत. पाकिस्‍तानचे पंतप्रधानपद तीनवेळा भूषवलेले नवाज शरीफ यांचे ते बंधू आहेत. शहबाज शरीफ हे एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 या काळात पाकिस्तानचे पंतप्रधानपद भूषवले हाेते. त्यावेळीही त्यांनी पीपीपीसोबत आघाडी करून सरकार चालवले होते.शेहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदासाठी 336 सदस्यीय संसदेत 169 मतांची गरज हाेती. ( Shehbaz Sharif become Pakistan’s Prime Minister )

Shehbaz Sharif : शेहबाज सर्वोत्तम पर्याय : नवाज शरीफ

आगामी दीड ते दोन वर्ष पाकिस्‍तानसाठी अत्‍यंत कठीण असतील. आम्‍हाला या काळात एकजुटीने राहावे लागेल. आमच्‍या विरोधकांचा सामना करावा लागेल. या काळात शेहबाज शरीफ हे पंतप्रधानपदासाठीचे सर्वोत्तम पर्याय आहेत, असे पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (PML-N) चे सर्वेसर्वा व माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सांगितले.

पाकिस्तानातील सर्वात मोठी समस्या महागाई आहे. आगामी सरकारला महागाई, अन्नधान्याच्या किमती आणि उपयुक्तता बिले कमी करून तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन मूल्य स्थिर करून जनतेला दिलासा द्यावा लागेल. मागील सत्ता काळात शेहबाज यांनी त्यांच्या अल्पकालीन कार्यकाळात प्रचंड आव्हानांचा सामना करावा लागला, असेही नवाज शरीफ म्‍हणाले.

सोमवारी होणार शपथविधी सोहळा

सोमवार, ४ मार्च रोजी शेहबाज शरीफ हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

हेही वाचा :

 

Back to top button