माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था : पंतप्रधान मोदी

माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था : पंतप्रधान मोदी

अबुधाबी : वृत्तसंस्था : माझ्या तिसऱ्या कार्यकाळात मी भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनलेली असेल, ही गॅरंटी मी देशाला दिली आहे. मोदीची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी असते, हे सिद्ध झालेले आहे, असे विश्वासपूर्ण प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले.

आम्ही ५ कोटींवर लोकांना पक्की घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. त्याबद्दलची गॅरंटी मी आधीच दिली होती, असेही मोदींनी स्पष्ट केले. यूएईतील अबुधाबीच्या शेख झायद स्टेडियममध्ये अहलान मोदी (नमस्कार मोदी) या कार्यक्रमात भारतीय समुदायाला उद्देशून ते बोलत होते. ६५ हजारांवर जनसमुदाय कार्यक्रमाला हजर होता.

भारत-यूएई मैत्री झिंदाबाद

यूएई हा भारताचा तिसरा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आणि सातवा सर्वांत मोठा गुंतवणूकदार आहे, त्याचा उल्लेख आवर्जून करताना मोदी म्हणाले, यूएईतील भारतीय समुदायानेही इतिहास रचलेला आहे. इथल्या प्रत्येक हृदयाची कंपने भारत-यूएई मैत्री झिंदाबादचा जणू घोष करत आहेत. उद्या मंदिरात होणारा कार्यक्रम, हे या मैत्रीचेच द्योतक आहे, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.

सर्वाधिक वेगाने वाढती अर्थव्यवस्था कुठली, तर भारत. सर्वाधिक मोबाईल डेटा बापरणारा देश कुठला, तर भारत, सर्वाधिक दूधदुभते उत्पादित करणारा देश कुठला, तर भारत अशी आपल्या देशाची ख्याती वाढतच चाललेली आहे. इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत आम्ही जगात दुसऱ्या स्थानावर आलेलो आहोत. २०१५ मध्ये मी तुमच्या वतीने यूएई राष्ट्राध्यक्षांसमोर (शेख झायद) मंदिराचा प्रस्ताव मांडला तेव्हा त्यांनी ज्या जमिनीवर तुम्ही रेघ ओढाल ती मी तुम्हाला मंदिरासाठी दिली समजा, असा शब्द दिला. शेख झायद यांना मी जेव्हाही भेटतो, तेव्हा ते तुमचे (मूळ भारतीयांचे) कौतुक करतात. माझा ते जो काही सन्मान करतात, त्यामागे तुमचेच बळ आहे.

मोदी बोलले अरबी भाषा

भारत आणि यूएई मिळून वर्तमानाच्या लेखणीने जगाच्या वहीवर एका उज्ज्वल भवितव्याचा हिशेब मांडत आहेत. भारत- यूएई मैत्री ही आमची संयुक्त श्रीमंती आहे. एका उत्तम भविष्याचा पाया ही मैत्री रचते आहे, असे अरबी भाषेतून मोदींनी सांगितले. कलम, हिसाब, जमीन हे सारे शब्द आम्ही आमच्या भारतीय भाषांतून किती सहजपणे बोलताना वापरत असतो, हे सारे शब्द आखाती देशांतूनच भारतात पोहोचलेले आहेत, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news