पाकिस्तान संसद त्रिशंकू, सरकार स्थापन करण्‍यासाठी ‘या’ पर्यायांवर खल सुरु | पुढारी

पाकिस्तान संसद त्रिशंकू, सरकार स्थापन करण्‍यासाठी 'या' पर्यायांवर खल सुरु

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानमधील निवडणूक निकाल आता स्‍पष्‍ट होत आहेत. कोणताही एका पक्षाला जनतेने स्‍पष्‍ट बहुमत दिलेले नाही. त्‍यामुळे संसद त्रिशंकू अवस्‍थेत आहे. इम्रान खान यांना पाठिंबा देणारे अपक्ष उमेदवारांनी ९० पेक्षा अधिक जागा जिंकल्‍या आहेत. नवाज शरीफ यांचा पक्ष ७२ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ( Pakistan Election Results 2024 ) माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि इम्रान खान समर्थक अपक्ष उमेदवारांनी सत्ता स्‍थापनेच्‍या हालचाली सुरु केल्‍या आहेत.

Pakistan Election Results 2024 : काेणत्‍याही पक्षाला स्‍पष्‍ट बहुमत नाही

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या एकूण 336 जागा आहेत. त्यापैकी 265 जागांवर निवडणूक झाली. एका जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे तर एका जागेचा निकाल नियमभंगामुळे फेटाळण्यात आला आहे. येथे 15 फेब्रुवारीला पुन्हा मतदान होणार आहे. उर्वरित 70 जागा राखीव आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी 134 जागांवर बहुमत असणे आवश्यक आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन), पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) या तीन पक्षांपैकी दाेघांना नवं सरकार स्‍थापन करण्‍यासाठी एकमेकांची मदत घेणे अनिवार्य आहे.

इम्रान खान यांच्‍या पक्षाच्‍या समर्थक उमेदवारांना सर्वाधिक जागा

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने आतापर्यंत २६५ पैकी २५५ जागांचे निकाल जाहीर केले आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्‍या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या समर्थक उमेदवारांनी नॅशनल असेंब्लीच्या सर्वाधिक 90 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) या पक्षाने ७३ तर पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) 54, मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) 17 आणि इतर जागा छोट्या पक्षांनीही आपलं अस्‍तित्‍व दाखवलं आहे. इम्रान खान आणि नवाझ शरीफ या दोघांनीही निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे.

Pakistan Election Results 2024 : शरीफ यांच्‍या हालचाली सुरु

त्रिशंकू संसदेचे संकेत दिल्यानंतर पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सरकार स्‍थापण्‍यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्‍या आहेत.  पाकिस्‍तान लष्‍कराचेही त्‍यांना समर्थन असल्‍याचे मानले जात आहे. पाकिस्‍तानला राजकीय अस्‍थिरतेतून बाहेर काढण्‍यासाठी आपला पक्ष देशाला राजकीय संकटातून बाहेर काढण्यासाठी अपक्षांशी हातमिळवणी करण्यास तयार असल्‍याचे त्‍यांनी जाहीर केले आहे. ‘पीपीपी’चे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी आणि त्यांचे वडील आसिफ अली झरदारी यांनी नवाझ शरीफ आणि त्यांचे भाऊ शेहबाज यांच्यासोबत संयुक्त आघाडी स्थापन करण्यासाठी स्वतंत्र बैठका घेतल्‍या. यासंदर्भात शरीफ यांच्या पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, “असिफ अली झरदारी आणि नवाझ शरीफ यांची जाति उमरा येथे बैठक झाली ज्यामध्ये दोघांनी इस्लामाबादमध्ये आघाडी सरकार स्थापन करण्यावर चर्चा केली. तसेच शेहबाज शरीफ यांनी जेयूआय-एफ प्रमुख मौलाना फजलुर रहमान आणि एमक्‍यूएम प्रमुख खालिद मकबूल सिद्दीकी यांनाही दूरध्वनी करून आघाडी सरकारच्या स्थापनेच्या संभाव्यतेवर चर्चा केल्याचे वृत्त आहे.

इम्रान खान पक्षाचे समर्थक उमेदवारांचेही सरकार स्‍थापण्‍याचे लक्ष्‍य

पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान भ्रष्‍टाचार प्रकरणी शिक्षा झाल्‍याने सध्‍या अडियाला कारागृहात आहेत. यांच्‍या पक्षाचे समर्थक असलेले उमेदवारही सरकार स्थापन करण्याचा विचार करत आहेत, असे तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्‍या वरिष्ठ साहाय्यकाने म्‍हटले आहे. अंतिम निवडणूक निकाल जाहीर न झाल्यास आपल्‍या समर्थकांनी शांततेने आंदोलन करण्याचे आवाहनही इम्रान खान यांनी केले आहे.

इम्रान खान यांच्‍या पाकिस्तान तहरीक-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष गोहर खान हे इम्रान खान यांचे वकील म्हणूनही काम करतात, त्यांनी पाकिस्तानमधील “सर्व संस्थांना” त्यांच्या पक्षाच्या जनादेशाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. ‘पीटीआय’चे केंद्रीय माहिती सचिव रऊफ हसन यांनी सांगितले की, बहुतेक निवडून आलेले उमेदवार प्रत्यक्ष भेटी होऊ शकल्या नाहीत. पीटीआय-समर्थित अपक्षांनी उर्वरित जागा मिळविल्यास संभाव्य युती भागीदारांशी वाटाघाटी सुरु होती. पीएमएल (क्यू) सारखे पक्षांशी चर्चा होती. हा पक्ष यापूर्वी पीटीआय सरकारमधील मित्रपक्ष होता.

‘पीपीपी’ही पंतप्रधानपदासाठी आग्रही

पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे ज्‍येष्‍ठ नेते खुर्शीद शाह यांनी म्‍हटलं आहे की, त्यांचा पक्ष नवाझ शरीफ यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारणार नाही. पाकिस्‍तानमध्‍ये आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास बिलावल झरदारी ( पाकिस्‍तानच्‍या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुत्तो यांचे पुत्र ) त्यांच्या पक्षाकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. दरम्‍यान, नवाज शरीफ यांचे बंधू आणि माजी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना पंतप्रधान म्‍हणून लष्‍कराची पहिली पसंती असल्‍याचेही मानले जात आहे.

आमच्या पक्षाशिवाय पाकिस्तानमध्ये सरकार बनवणे अशक्य : बिलावल

पाकिस्‍तानमध्‍ये आघाडी सरकार स्‍थापन होणार का, या प्रश्‍नावर उत्तर देताना माजी परराष्ट्र मंत्री आणि पीपीपी नेते बिलावल भुत्तो ‘जिओ न्यूज’शी बोलताना म्हणाले की, आमच्या पक्षाशिवाय पाकिस्तानमध्ये सरकार बनवणे शक्य नाही. मात्र कोणाचे सरकार असेल हे आत्ताच सांगता येत नाही. सर्व जागांचे निकाल अद्याप आलेले नाहीत. सध्या पीपीपीने पीएमएल-एन, पीटीआय किंवा अन्य कोणत्याही पक्षाशी युती करण्याचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही सध्या काही अपक्षांच्या संपर्कात आहोत. मात्र ‘पीटीआय’ला पाठिंबा देणाऱ्या कोणत्याही स्वतंत्र पक्षाने अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. पीपीपीने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवले आहे. याबाबत काही बदल करायचे असतील तर पक्षासोबत बैठक घेऊनच निर्णय घेतला जाईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Back to top button