

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्थिक अरिष्ट, हिंसाचाराच्या वाढत्या घटना आणि अस्थिर राजकीय वातावरणात पाकिस्तानमध्ये आज (दि. ८) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान कोण, या प्रश्नाचे उत्तर ही निवडणूक देणार आहे. १२८ दशलक्ष मतदार देशातील पुढील सरकार आणि चार प्रांतांमधील विधानसभेचे सत्ताधीशही ठरवणार आहेत. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तत्काळ मतमोजणी सुरू होणार असून, काही तासांमध्ये पाकिस्तानमधील निवडणूक निकाल स्पष्ट होणार आहेत. ( Pakistan election 2024)
पाकिस्तानमध्ये १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. देशाची एकूण लोकसंख्या २४१ दशलक्ष असून, १२८ दशलक्ष मतदार आहेत. ६९ दशलक्ष पुरुष तर ५९ दशलक्ष महिला मतदार आहेत. २०१८ मधील राष्ट्रीय निवडणुकीत येथे ५२ टक्के मतदान झाले होते, तर १९७१ साली येथे सर्वाधिक ६१ टक्के मतदान झाले होते.
पाकिस्तानमधील ही १२ वी सार्वत्रिक निवडणुका आहे. या देशात तब्बल तीन दशकांहून अधिक काळ लष्कराने राज्य केले आहे. तसेच आजही थेट सत्तेत नसतानाही राजकारणात लष्कराचाच प्रभाव आहे, ही वस्तुस्थिती माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी मान्य केली होती. ही देशातील सलग तिसरी सार्वत्रिक निवडणूक असून, ५१२१ उमेदवार रिंगणात आहेत. यातील ४८०६ पुरुष आहेत. तर ३१२ महिला असून २ तृतीयपंथीय आहेत. १६७ राजकीय पक्ष निवडणूक लढवत असून, तब्बल ९० हजार ५८२ मतदान केंद्र आहेत.
कारागृहात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) राजकीय पक्षावरील कारवाई झाली आहे. इम्रान खान यांना निवडणूक लढवण्यावर बंदी आहे. त्यांच्या राजकीय पक्षाला निवडणूक चिन्ह क्रिकेट बॅट वापरण्यासही नकार देण्यात आला आहे.
इम्रान खान यांच्या कार्यकाळात पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती बिघडली, महागाई वाढली आणि अनेक विरोधी नेते तुरुंगात गेले, प्रसारमाध्यमांवर बंदी घालण्यात आली आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनासह पत्रकारांवर हल्ले झाल्याच्या बातम्या आल्या. पाकिस्तान-तालिबानसोबतच्या शांतता वाटाघाटी असोत किंवा अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला पाठिंबा असो, खान यांच्यावर या बाबींसाठी मोठ्या प्रमाणावर टीका झाली.अलीकडच्या काळात इम्रान खान यांची लोकप्रियता कमी झाल्याचं पाकिस्तानातील काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
पाकिस्तानात २०२३ मध्ये झालेल्या राष्ट्रीय जनगणनेनुसार, अनेक मतदारसंघांच्या सीमा बदलण्यात आल्या आहेत. तसेच नॅशनल असेंब्लीच्या एकूण जागा 272 वरून 266 पर्यंत घटल्या आहेत. तर वायव्य खैबर पख्तुनख्वा प्रांतात 39 वरून 45 जागांची वाढ झाली आहेत. लोकसंख्येनुसार सर्वात मोठा प्रांत असलेल्या पंजाबने 141 जागा राखल्या. नॅशनल असेंब्लीच्या निम्म्याहून अधिक जागांसह पंजाब प्रांत सर्वात मोठे राजकीय रणांगण मानले जात आहे. सिंध हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला दुसरा प्रांत आहे. बलुचिस्तान सर्वात मोठा सर्वात गरीब प्रांत आहे. दोघांनीही त्यांच्या मागील राष्ट्रीय असेंब्लीच्या जागा अनुक्रमे 61 आणि 16 वर कायम ठेवल्या.
इस्लामाबाद कॅपिटल टेरिटरीमध्ये ( इस्लामाबाद राजधानी क्षेत्र) पूर्वीप्रमाणेच तीन जागा आहेत. याव्यतिरिक्त, 60 जागा महिलांसाठी आणि 10 अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत, ज्या राष्ट्रीय असेंब्लीमध्ये 5 टक्के प्रमाणात प्रतिनिधित्वाच्या आधारावर वाटप केल्या जातात. नॅशनल असेम्ब्लीमध्ये 336 जागा असून त्यापैकी 266 जागा `फर्स्ट पास्ट द पोस्ट व्होटींग' पद्धतीने निवडून येतात. महिलांसाठी 60 जागा असून, मुस्लिमेतर अल्पसंखख्याकांसाठी 10 जागा राखीव आहेत.
नॅशनल असेंब्लीबरोबर गुरुवार ८ फेब्रुवारी २०२४ रोजी बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा, पंजाब आणि सिंध या चार प्रांतांच्या विधानसभा प्रतिनिधींसाठीही मतदान होईल. मुख्यमंत्र्यांसाठी मतदान होईल. पंजाब प्रांत 371 जागांसह सर्वात मोठी विधानसभा हे. सिंधच्या विधानसभेत 168, खैबर पख्तूनख्वामध्ये 124 आणि बलुचिस्तानमध्ये 65 विधानसभेच्या जागा आहेत.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे यंदाच्या निवडणुकीत ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले ओत. पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) – पीएमएल-एन हा त्याचा पक्ष यंदा निवडणूक लढवत आहे. मागील निवडणुकीत ते भ्रष्टाचार प्रकरणी कारागृहात होते. प्रकृती खालावल्यानंतर ते 2019 मध्ये उपचारासाठी लंडनला गेले. गेल्या वर्षी ते मायदेशी परतले. 2022 मध्ये, इम्रान खान सत्तेतून बाहेर पडल्यानंतर नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांनी नेतृत्वाची सूत्रे हाती घेतली.
2024 च्या निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच, नवाझ शरीफ यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आणि त्यांच्यावर निवडणूक लढवण्याची आजीवन बंदी देखील घटनाबाह्य होती, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे नवाझ शरीफ यांचा चौथ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. गेल्या सहा महिन्यांत शरीफ यांची लोकप्रियता वाढली आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) पक्षाचे बिलावल भुट्टो झरदारी हे माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचे पुत्र आहेत. 2007 मध्ये बेनझीर यांची हत्या झाली होती. बिलावल भुट्टो हे देशाचे मंत्री राहिले. बिलावल यांचा पक्षाने मोठी आश्वासने दिली आहेत. सध्याची परिस्थिती त्यांना पूर्ण सत्ता काबीज करणे अशक्य दिसतंय. पण युतीचं सरकार स्थापन झाल्यास ते किंगमेकर ठरू शकतात, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.