झाकीर हुसैन यांना एका रात्रीत 3 ग्रॅमी! वाह उस्ताद! | पुढारी

झाकीर हुसैन यांना एका रात्रीत 3 ग्रॅमी! वाह उस्ताद!

लॉसएंजेलिस, वृत्तसंस्था : संगीतविश्वातील मानाच्या 66 व्या ग्रॅमी पुरस्कार 2024 सोहळ्यात भारताचा डंका वाजला. तबला नवाझ उस्ताद झाकीर हुसैन, गायक शंकर महादेवन, तालवादक व्ही. सेल्वगणेश, व्हायोलिनवादक गणेश राजगोपालन यांना ‘धिस मोमेंट’ या अल्बमसाठी ‘द बेस्ट ग्लोबल अल्बम’चा पुरस्कार देण्यात आला. झाकीर हुसैन यांनी 3, तर बासरीवादक राकेश चौरसिया यांनी 2 ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड पटकावले!

बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम व ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणींत भारतीयांनी बाजी मारली. ग्रॅमी सोहळ्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता सुरुवात झाली. झाकीर हुसैन आणि शंकर महादेवन यांच्या ‘शक्ती’ या फ्युजन बँडच्या ‘धिस मोमेंट’ या अल्बमला बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम या श्रेणीसाठी ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या अल्बममध्ये महादेवन आणि हुसैन यांच्यासह जॉन मॅक्लॉफलिन, व्ही. सेल्वागणेश आणि गणेश राजगोपालन यांनी आपली कला सादर केली आहे.

झाकीर हुसैन यांनी बेला फ्लेक आणि एडगर मेयर यांच्यासमवेत ‘पश्तो’ अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स या श्रेणीअंतर्गतही ग्रॅमी पुरस्कार पटकावला. हुसैन यांच्यासह एका अल्बममध्ये बासरीवादक राकेश चौरसिया यांचीही साथ आहे. अशा प्रकारे झाकीर हुसैन यांनी या सोहळ्यात एका रात्रीत 3 ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड जिंकले, तर राकेश चौरसिया यांनी दोन पुरस्कारांवर नाव कोरले आहे.

वाह उस्ताद!

1988 : झाकीर हुसैन यांना ‘पद्मश्री’ देण्यात आला.
2002 : ‘पद्मभूषण’ देण्यात आला.
2009 : ग्रॅमी अ‍ॅवॉर्डच्या रूपात यापूर्वीही त्यांनी जागतिक सन्मान मिळविला आहे.
2024 : एका रात्रीत 3 ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड! वाह उस्ताद!!

Back to top button