Jordan Attack : जॉर्डन हल्ल्यानंतर अमेरिका चौताळली, इराणमध्ये घुसून करणार हल्ला? | पुढारी

Jordan Attack : जॉर्डन हल्ल्यानंतर अमेरिका चौताळली, इराणमध्ये घुसून करणार हल्ला?

पुढारी ऑनलाईन डेस्क : इराण समर्थित हुथी बंडखोरांनी जॉर्डनमध्ये ड्रोन हल्ला केला, ज्यात तीन अमेरिकन सैनिक ठार झाले. या हल्ल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यावर इराणविरुद्ध युद्ध सुरू करण्यासाठी राजकीय दबाव वाढला आहे. बायडेन यांनी इराणविरुद्ध कोणतीही थेट कारवाई करण्याचे टाळले असले तरी, युनायटेड स्टेट्स याचा कथितरित्या बदला म्हणून इराण-समर्थित गटांवर हल्ले करण्याची तयारी करत आहे.

जॉर्डन येथील अमेरिकेच्या एका लष्करी चौकीवर सोमवारी ड्रोन हल्ला झाला होता. यात अमेरिकेच तीन जवान ठार झाले, तर ३० सेवा कर्मचारी जखमी आहेत. या हल्ल्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षात अमेरिकन सैनिक मारले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या हल्ल्याता प्रत्युत्तर द्यावे लागेल, असे म्हटले होते. इराण-समर्थित गटांवर बदला म्हणून हल्ले करण्याची तयारी अमेरिकेकडून केली जात आहे. ‘इंडिया टूडे’ या वृत्तसंस्थेन पेंटागॉनच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत ही सूडाची कारवाई सुरू होऊ शकते.

इराणवर हल्ला केल्यास अमेरिका युद्धात अडकेल

अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यास इराणही जोरदार प्रत्युत्तर देईल, यामुळे अमेरिका मध्यपूर्वेत युद्धात अडकू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. वॉशिंग्टनस्थित मिडल इस्ट इन्स्टिट्यूटचे चार्ल्स लिस्टर यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, हल्ल्याच्या प्रत्युत्तरात अमेरिका इराक किंवा सीरियामध्ये इराण समर्थित गटांवर मोठी कारवाई करू शकते. ते म्हणाले, ‘रविवारी सकाळी जे घडले ते गेल्या दोन-तीन महिन्यांत इराणच्या प्रॉक्सींनी केलेल्या कारवाईच्या पूर्णपणे विरुद्ध होते. पण इराणवर हल्ला करण्यासाठी इतक्या चिथावणी देऊनही हे प्रशासन असे काही करेल असे मला वाटत नाही.’ एका अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, ‘जोपर्यंत अमेरिका युद्धासाठी पूर्णपणे तयार होत नाही तोपर्यंत इराणवर हल्ला करून आम्हाला काय मिळणार नाही.’

Back to top button