Dani Li Passes Away : स्लिम-ट्रिमचे फॅड ठरले जीवघेणे! लिपोसक्शन शस्त्रक्रियेने 'या' गायिकेचा मृत्यू | पुढारी

Dani Li Passes Away : स्लिम-ट्रिमचे फॅड ठरले जीवघेणे! लिपोसक्शन शस्त्रक्रियेने 'या' गायिकेचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी अनेक सेलिब्रिटी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करत असल्याचे सध्या पाहायला मिळते. अनेक वेळा त्याचे सकारात्मक परिणाम होतात तर अनेक सेलिब्रिटींना या शस्त्रक्रियांच्या चुकीच्या परिणामांमुळे आपला जीवही गमवावा लागतो. असाच काहीसा प्रकार नुकताच ब्राझीलच्या प्रसिद्ध पॉप स्टार डॅनी लीसोबत घडला आहे. लिपोसक्शन शस्त्रक्रिये दरम्यान डॅनी ली हिचा मृत्यू झाला. वयाच्या ४२ व्या वर्षी तिच्या निधनाने ब्राझीलच्या संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

‘Eu sou da Amazonia’ या हिट गाण्याने ब्राझीलमध्ये प्रसिद्ध झालेल्या डॅनी ली हिने नुकतीच कॉस्मेटिक सर्जरी केली होती. तिने आपल्या शरीराच्या काही भागावरील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी ही लिपोसक्शन शस्त्रक्रिया केली होती. ज्याद्वारे तिने तिच्या पोट आणि पाठीवरील चरबी कमी केली होती. परंतु त्यानंतर तिला अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले. तिची तब्येत अचानक बिघडली आणि यातच तिचा मृत्यू झाला. डॅनीच्या निधनाने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डॅनी ली विवाहित होती, तिला ७ वर्षांची मुलगी आहे.

लिपोसक्शन शस्त्रक्रिया म्हणजे काय?

सध्या लिपोसक्शन सर्जरीचा ट्रेंड खूप लोकप्रिय आहे. ही एक प्रकारची कॉस्मेटिक शस्त्रक्रिया आहे. ज्याद्वारे लोक त्यांच्या शरीराच्या कोणत्याही भागातून जसे की पोट, मांड्या, स्तन आणि पाठ इत्यादीवरील अतिरिक्त चरबी काढून टाकतात. परंतु ही शस्त्रक्रिया मानली जाते तितकी सोपी नसते. अतिशय गुंतागुंतीची असलेल्या या शस्त्रक्रियमुळे जीवाला धोकासुद्धा निर्माण होतो.

Back to top button