इराणचा पाकवर ‘सर्जिकल स्ट्राईक’, सर्वात मोठा दहशतवादी तळ उद्ध्वस्त | पुढारी

इराणचा पाकवर ‘सर्जिकल स्ट्राईक’, सर्वात मोठा दहशतवादी तळ उद्ध्वस्त

इस्लामाबाद/तेहरान; वृत्तसंस्था : इराणने पाकिस्तानमधील बलुचिस्तानातील ग्रीन माऊंटन भागातील जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. इराणच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात 2 मुले मरण पावल्याचा तसेच 3 मुली जखमी झाल्याचा आरोप पाकिस्तानने केला असून, इराणला या हल्ल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे.

पाकमध्ये हवाई हल्ला केल्याचे वृत्त मंगळवारी मध्यरात्री इराणच्या ‘इर्ना’ या सरकारी माध्यम संस्थेने आपल्या पोर्टलवर दिले; पण नंतर काही वेळाने ते काढून टाकले. अर्थात, तत्पूर्वी ही बातमी जगभर पसरली होती. दरम्यान, इराणने आमच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले असून, त्याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील, असा इशारा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. इराणच्या राजदूतालाही पाकने समन्स बजावले असून, आपल्या संतप्त भावना कळविल्या आहेत. दुसरीकडे, ‘तस्नीम’ या इराणमधील वृत्तसंस्थेने आपल्या संकेतस्थळावर पाकिस्तानवरील हल्ल्याची बातमी दिली आहे.

राजदूताला परत बोलावले

पाकिस्तानने इस्लामाबादेतील इराणच्या राजदूताला देश सोडण्याचे फर्मान सोडले आहे. तेहरानमधील आपल्या राजदूतालाही पाकने तडकाफडकी परत बोलावून घेतलेले आहे.

इराणची सीमेवर जमवाजमव

इराणने सीमेलवर लष्कराची जमवाजमव वाढविली आहे. दहशतवाद्यांची ढाल करून पाकिस्तान इराणविरुद्ध प्रत्युत्तरादाखल कारवाई करू शकतो, असे मानले जात आहे.

Back to top button