टोकियो ः वृत्तसंस्था : 1 जानेवारी रोजी आलेल्या 7.6 रिश्टर क्षमतेच्या भूकंपाने जपानचा भूगोलच बदलून टाकला आहे. या भूकंपामुळे नोटो भागातील बेटांची उंची वाढली असून, त्याचा समुद्रकिनारा थोडा थोडका नव्हे, तर 820 फूट दूर गेला आहे. असे प्रकार 10 ठिकाणी घडले आहेत.
नवीन वर्षाचा पहिला दिवस जपानसाठी प्रलयंकारी ठरला. स्थानिक वेळेनुसार दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी जोरदार भूकंप झाला. 7.6 रिश्टर क्षमतेच्या या भूकंपाने जमीन हादरली. पाठोपाठ 5 तासांत 50 भूकंप जपानने अनुभवले. सुनामीही आली. या भूकंपात अनेक बेटांवर मोठे नुकसान झाले; पण खरे नुकसान आता समोर आले आहे.
उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांनी या भूकंपाचे परिणाम जगासमोर आणले आहेत. जपानच्या नोटो बेटाचे हे फोटो असून, भूकंपामुळे या बेटाची उंची वाढली आहे. त्यामुळे या बेटाचा समुद्रकिनाराही दूर गेला आहे. थोडाथोडका नव्हे, तर 820 फूट अर्थात 250 मीटरने समुद्र या बेटापासून लांब गेला आहे. काही भागांतील बंदरेही कोरडीठाक झाली असून, तेथे आता बोटींना पोहोचणेही अशक्य बनले आहे.
टोक्यो विद्यापीठाच्या भूकंप संशोधन केंद्राने म्हटले आहे की, जपानच्या नोटो प्रांतातील उत्तरेकडील किनार्यांवर हे प्रकार घडले आहेत. कैसो ते अकासाकी या भागात जमीन वर उचलली गेली असून, त्याचा परिणाम म्हणून किनारे बेटापासून दूर गेले आहेत.
जपानच्या जाक्सा या उपग्रहाने जमीन वर उचलली गेल्याची छायाचित्रे टिपली आहेत. 23 जून 2023 ची छायाचित्रे आणि 2 जानेवारी 2024 ची छायाचित्रे यांची पडताळणी केली असता हा बदललेला भूगोल समोर आला आहे. नाफुने बंदर, वाजिमा शहर आणि मिनाझुकी खाडी यासह दहा भागांत हा प्रकार अधिक स्पष्टपणे जाणवतो.