पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलचे गाझावर (Gaza war) हल्ले सुरुच आहेत. दरम्यान, शनिवारी दक्षिण गाझा पट्टीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ७१ लोक ठार झाले. तर २८९ जखमी झाले आहेत, अशी माहिती गाझामधील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. याबाबतचे वृत्त AP ने दिले आहे.
खान युनूस परिसरात हा हल्ला झाला. यात हल्ल्यात ७१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे २८९ जण जखमी झाले आहेत. अनेक जखमी आणि मृतांना जवळच्या नासेर रुग्णालयात नेण्यात आले आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
दक्षिण गाझा पट्टीवर शनिवारी अनेक हल्ले करण्यात आले. या हल्ल्यानंतर येथे येथे मोठी जीवितहानी झाली. असोसिएटेड प्रेसच्या पत्रकारांना येथे ४० मृतदेह दिसून आले आहेत.
दरम्यान, इस्रायली सैन्याने पुष्टी केली आहे की हमासच्या लष्करी शाखेचे प्रमुख मोहम्मद देफ हे शनिवारी दक्षिण गाझा शहरातील खान युनिस येथे केलेल्या हल्ल्याचे टार्गेट होते. ज्यात ७१ लोक ठार आणि २८९ जखमी झाले. इस्त्रायली आर्मी रेडिओने म्हटले आहे की, या हल्ल्यात देफ मारला गेला की नाही हे स्पष्ट झालेले नाही.
हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ले केले. अनेक दहशतवादी दक्षिण इस्रायलमध्ये घुसले. यात १,२०० जणांचा मृत्यू झाला. तर २५० लोकांचे अपहरण करण्यात आले होते. हमासच्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल इस्रायलने गाझावर जोरदार हल्ले सुरु केले. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत ३८,३०० हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि ८८ हजारहून अधिक जखमी झाले आहेत.
गाझातील २३ लाख लोकांपैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी त्यांचे घर सोडले आहे. यातील बहुतांक लोकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. ते छावण्यांमध्ये गर्दी करुन राहात आहेत.